– विद्याधर वालावलकर
जमिनीखालील पाणी हा एक उत्तम जलस्रोत आहे. आज शेतात आणि शहरांतील गृहसंकुलांत भूजल मिळवण्यासाठी नलिकाविहिरी वा बोअरवेल खणण्याचा सर्वमान्य प्रघात आहे. अवैज्ञानिक पद्धतीने आणि योग्य तांत्रिक सल्ला न घेता या विहिरी खणल्याने अनेकदा जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होणे किंवा जमिनीखालील पाण्याचा साठा प्रदूषित होणे असे दुष्परिणाम होतात.
बोअरवेल कुठे खणावी यासाठी जलभूगर्भतज्ज्ञ त्या भागाच्या भूगर्भीय नकाशाचा आणि त्या परिसरातील जमिनीखालील दगडांचा अभ्यास करून पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेतात. काही विशिष्ट प्रकारचे दगड किंवा दगडांचे समूह असल्यास त्यामध्ये पाणी असण्याची शक्यता जास्त असते. जमिनीखालील पाण्याची हालचाल किंवा प्रवाह जाणण्यासाठी जमिनीची नैसर्गिक उंचसखलता दर्शवणारा नकाशा साहाय्यक ठरतो. भूजलतज्ज्ञ अनेकदा त्या जागेची हवेतून काढलेली छायाचित्रे पाहून जमिनीला असलेल्या भेगा आणि खडकांतील भेगांच्या साहाय्याने जमिनीखालील पाण्याचा वेध घेतात.
जमिनीखालील पाणी मुख्यत: गाळामध्ये आणि गाळाच्या खडकामध्ये असलेल्या पोकळ्यांत असते. हे पाणी जमिनीमध्ये पाण्याची एक पातळी निर्माण करते, त्याला ‘वॉटर टेबल’ असे म्हणतात. यामध्ये पाणी प्रवाहीसुद्धा असते. ग्रॅनाइट किंवा बेसॉल्ट खडकाच्या जमिनीत पोकळ्या कमी असतात. चुनखडीच्या खडकाच्या ठिकाणी अशी विहीर खणणे कठीण असते.
अनेकदा अशा प्रकारच्या वैज्ञानिक शक्यतांबरोबर स्थानिक पाणीशोधकांकडून पारंपरिक पद्धतीने अचूकपणे पाण्याचा वेध घेता येतो. हातात नारळ वा काटेरी काठी किंवा ‘एल’ आकाराची तार अथवा लंबक घेऊन हे पाणीशोधक जमिनीवर चालतात. त्यांच्या ‘विज्ञाना’प्रमाणे जमिनीखालील पाण्याचे प्रवाह अवरुद्ध होऊन एका ठिकाणी जमा होत असल्यास त्यामधील विविध प्रकारच्या ऊर्जामुळे हातातील उपकरणाच्या संवेदनशीलतेद्वारे पाण्याचा संचय ओळखता येतो. उंबराचे झाड किंवा विशिष्ट झाडाची त्या भूभागात झालेली वाढ अशा नैसर्गिक सूचकांनीही (इंडिकेटर) जमिनीखालील पाणी निश्चितपणे शोधता येते.
०
‘युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्स’ (खंड अकरावा, मार्च १९९०, पृष्ठ – १०७) मध्ये नमूद आहे की, फ्रँक इरॉन्स या साउथ वेल्स विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने पाणी व धातूंच्या जमिनीतील साठय़ामुळे लंबकाच्या आंदोलनात फरक पडतो, हे सप्रमाण सिद्ध केले.
मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org