आपण आरामात बसले आहोत आणि वाहनांनी स्वत:चे डोके वापरून म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपल्याला योग्य जागी, योग्य वेगात आणि वेळेत सुरक्षितपणे नेले तर किती मजा येईल नाही! अशा रोमांचक रोबोटिक वाहनांच्या जगात आपले स्वागत करण्यासाठी वाहन उद्योग सज्ज आहे. रोबोटिक्स फेडरेशनच्या प्रमुख मरिना बिल म्हणतात, ‘‘आजकाल यंत्रमानव स्वयंचलित उद्याोगांत मोठी भूमिका बजावत आहेत. हे ऑटोमेशन दीर्घकाळ प्रस्थापित असलेल्या पद्धतींच्या दृष्टीने खूप मदत करेल.’’

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संगणकीय दृष्टीचा (कॉम्प्युटर व्हिजनचा) तसेच स्वयंचलित यंत्रमानव (ऑटोमेटेड रोबोट्स) इत्यादी तंत्रांचा वापर करून वाहन निर्मात्यांना स्मार्ट, सुरक्षित वाहने तयार करण्यात मदत केली आहे.

रोबोटिक गाडी ही कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित स्वयंचलित गाडी आहे. मानवी हस्तक्षेपाविना ती गाडी स्वत:च चालते. त्यात लेझर, कॅमेरा आणि संवेदक उपकरणे यासारखी वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे, सामान्य मानवी चालकाच्या तुलनेत रोबोटिक गाड्यांमध्ये अपघात होण्याची शक्यता कमी असते. या गाड्या थेट वैश्विक स्थान निश्चिती प्रणालीशी (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमशी-जीपीएस ) जोडलेल्या आहेत. जीपीएसमुळे, त्या थेट गंतव्यस्थानाकडे जाऊ शकतात.

हेही वाचा >>> कुतूहल : स्मार्ट शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुविधा

अशा गाड्यांची सर्वात सुरक्षित गोष्ट म्हणजे त्या चट्कन बाजूला (साइड-ट्रॅक) होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. या गाड्यांमध्ये संवेदक कृत्रिम बुद्धिमत्ता खूप जवळ येत असलेल्या वस्तू शोधण्यास मदत करते. म्हणून जेव्हा जेव्हा एखादी वस्तू खूप जवळ येते तेव्हा स्वयंचलित गाडी माणसासारख्या प्रतिक्रिया देते. ही प्रतिक्रिया दूर जाण्याच्या किंवा वळण्याच्या स्वरूपात असेल. त्यामुळे या प्रणालीचालित गाड्या अतिशय सुरक्षित आहेत. स्मार्ट वाहतूक व्यवस्थापनात व्हिडीओमधून वेगाचे निरीक्षण, रहदारीचा अंदाज आणि वाहनांचा मागोवा घेणे समाविष्ट असते.

ऑटोमेशन उद्याोगातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांमुळे, रोबोटिक गाड्यांची निर्मिती दहा लाखांवर पोहोचली आहे. तर, २०२३ ते २०२८ पर्यंत रोबोटिक गाड्यांची विक्री अंदाजे १३ लखांपेक्षा अधिक असेल. त्यामुळे बऱ्याच वाहन कंपन्या स्वयंचलित वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वयंचलित गाड्या ग्राहकांनाही आकर्षित करत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता भौगोलिक घटकांची विदा वापरून जहाजाची सुरक्षित जलवाहतूक आणि हवामान परिस्थितीचे निरीक्षण करते, तसेच बंदरातील गर्दी, इंधनाचा योग्य वापर आणि उत्सर्जन कमी करते, त्यामुळे पर्यावरणीय समतोल ठेवायला मदत करते.

प्रा प्रज्ञा काशीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org