अंटार्क्टिका खंड पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाच्या साधारण मध्यावर असलेल्या पठारावर असून त्याला अंटार्क्टिक महासागराने वेढलेले आहे. अंटार्क्टिक महासागर हा हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक या तीन महासागरांचा दक्षिण भाग आहे. अंटार्क्टिका खंड हा पृथ्वीवरचा एकमेव खंड आहे जिथे कधी युद्ध झाले नाही की त्यावर कोणत्याही राष्ट्राची मालकी नाही. सर्व दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित व राजकीयदृष्टय़ा तटस्थ असणारा हा खंड कायमस्वरूपी पर्यटन व विज्ञान यांसाठी राखीव राहावा म्हणून अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे १ डिसेंबर १९५९ रोजी एक महत्त्वाचा करार झाला. प्रथम अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, चिली, फ्रान्स, जपान, न्यूझीलंड, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन, उत्तर अमेरिका या १२ राष्ट्रांनी अंटार्क्टिका करारावर सह्या केल्या. आत्तापर्यंत पन्नासहून अधिक राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्या आहेत.  

भारताने १९८१ साली अंटार्क्टिकाच्या करारावर सही करून आणि कराराचा पंधरावा सल्लागार सभासद होऊन स्वत:च्या पहिल्या वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. भारताच्या अंटार्क्टिकावरील वैज्ञानिक मोहिमा आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधनाचा पाया ठरल्या आहेत. भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय व सागर संशोधन केंद्र (नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च) भारताच्या अंटार्क्टिकावरील वैज्ञानिक मोहिमांचे व संशोधनांचे नियोजन करते.

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

अंटार्क्टिका कराराला २००९ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त झालेल्या वार्षिक सभेत अंटार्क्टिका दिन दरवर्षी १ डिसेंबरला साजरा करण्याचे ठरले. अंटार्क्टिका खंडाचा कारभार सुलभ होण्यासाठी आंतरराष्ट्रीय खंडातील सुशासनाचा पाया असलेली संस्था ‘फाऊंडेशन ऑफ गुड गव्हर्नन्स ऑफ इंटनॅशनल स्पेस’ २०१० सालापासून ‘अंटार्क्टिका दिन’ साजरा करते. या खंडाचा सर्वंकष अभ्यास व त्यावर संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार वृिद्धगत करणे तसेच अभ्यासक्रमात अंटार्क्टिका हा विषय समाविष्ट करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना उद्युक्त करणे, हे अंटार्क्टिका दिन साजरा करण्याचे प्रमुख उद्देश आहेत. अंटार्क्टिका संबंधित संस्था आणि मोहिमेतील सहभागी घटक हा दिवस साजरा करताना अंटार्क्टिकाची भौगोलिक, वैज्ञानिक व पर्यावरणविषयक माहिती देऊन वैज्ञानिकांना मोहिमेमध्ये सहभागी होण्यास प्रेरित करतात. तसेच सर्वसामान्य जनतेसाठी व विद्यार्थ्यांसाठी अंटार्क्टिकासंबंधी व्याख्याने,  चित्रफिती, प्रदर्शन इत्यादींद्वारे माहिती दिली जाते.

 अनघा शिराळकर ,मराठी विज्ञान परिषद