तिसरी औद्यगिक क्रांती अजून सुरू असतानाच आता चौथी औद्यगिक क्रांती येऊ घातलेली आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला याची देही याची डोळा ही क्रांती पाहण्याची आणि त्याचा एक घटक होण्याची संधी मिळत आहे. हिला इंडस्ट्री ४.० नावानेही ओळखले जाते. क्लोस श्वाब या वल्र्ड इकॉनॉमिक फोरमच्या संस्थापक अध्यक्षाने हे नामकरण २०१६ साली केले.

चौथ्या क्रांतीचे गुणवैशिष्टय म्हणजे ही क्रांती अंकीय विश्व, भौतिक विश्व आणि जैविक विश्व यांच्यातील सीमारेषा पुसट किंवा नष्ट करून त्यांच्यात मेळ घालणारी असेल. जाणकारांच्या मते या क्रांतीदरम्यान जे बदल होतील ते आतापर्यंतच्या बदलांना कुठल्या कुठे मागे टाकतील. या क्रांतीत विविध तंत्रज्ञान शाखा एकेकटया तसेच परस्पर सहकार्याने काम करतील. उदा.- अंकीय तंत्रज्ञान (यात आयसीटी अंतर्भूत आहे), कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अध्ययन, रोबोटिक्स, मानव-यंत्र आंतरक्रिया, आभासी आणि आवर्धित वास्तव, थ्री-डी प्रिंटिंग किंवा समावेशक उत्पादन, अब्जांश तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, पुंज गणन, वस्तूंचे आंतरजाल, अतिजलद संदेशवहन तंत्रज्ञान, महाविदा, संवेदक तंत्रज्ञान इत्यादी प्रगत शाखा यात सक्रिय आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : तिसरी औद्योगिक क्रांती डिजिटल क्षेत्रात!

तिसऱ्या क्रांतीत जरी अंकीय तंत्रज्ञानाने आपले अस्तित्व सर्वव्यापी केले असले, तरी ते फार चतुर (स्मार्ट) किंवा बुद्धिमान (इंटेलिजन्ट) झाले नव्हते. चौथ्या क्रांतीचे विश्व हे चतुर आणि बुद्धिमान, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकणाऱ्या प्रक्रियांचे आणि यंत्रांचे असेल. नाना प्रकारचे आणि मोठया प्रमाणावरील संवेदक, आयओटी इत्यादी मोठया प्रमाणावर विदा म्हणजे बिग डेटा निर्माण करतील आणि या महाविदेचे अध्ययन करून यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रे निर्णय घेऊन स्व-चलित (ऑटोनॉमस) रीतीने कार्य करतील.

हेही वाचा >>> कुतूहल : पोलाद, वीज, रसायनांमुळे दुसरी औद्योगिक क्रांती

अशा स्व-चलित रीतीने काम करणाऱ्या बसगाडया, ट्रक, मोटारगाडया, बंदरांतील याऱ्या (क्रेन), कारखान्यांतील यंत्रे, साठवणकेंद्रांतील सामानाची हलवाहलव करणारे यंत्रमानव, अ‍ॅलेक्सा, सिरी यांच्यासारखे आभासी साहाय्यक, प्रथिनांची संरचना उलगडणारे, आपल्याला दिशादर्शन करणारे, तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अनेक अ‍ॅप्स, इत्यादी चतुर यंत्रणा आजच आपल्याला उपलब्ध आहेत आणि भविष्यात यांची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि व्याप्ती प्रचंड प्रमाणावर वाढत जाणार आहे.

या ज्ञानावर (नॉलेज) आधारित क्रांतीत आपण नक्की कोणत्या मुक्कामाला पोहोचू याचा अंदाज लावणे या घडीला तरी कठीण आहे.

– शशिकांत धारणे

 मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org