परिपूर्ण बुद्धिमत्ता प्रत्यक्षात आली तर ती स्वत:च नवीन तंत्रज्ञान विकसित करेल. नव्या बुद्धिमान प्रणाली घडवेल. त्या वेळी वेग, आवाका, कार्यदक्षता, याबाबत तिला माणसाची क्षमता कमी वाटू लागेल. मग माणसांची गरज उरणार नाही का? आज अनेकदा या प्रश्नावर चर्चा होताना दिसते.

अशा बुद्धिमत्ता प्रणाली एकत्रित काम करू लागल्या, माहितीची देवाणघेवाण करू लागल्या तर काय होईल? त्या एकमेकांकडून नवनवी कौशल्ये आत्मसात करू शकतील. सर्व मिळून एक महायंत्रणा म्हणून काम करू शकतील. त्या वेळी माणसाची जागा काय असेल? हा प्रश्नदेखील तितकाच सार्थ आहे.

विज्ञानाच्या विविध शाखांमधले तज्ज्ञ परिपूर्ण बुद्धिमत्तेसाठी काम करत आहेत. त्यांच्या दृष्टीने हे दोन्ही धोके नक्कीच आहेत. या बुद्धिमत्तेला स्वजाणीव असेल तर ती त्या दृष्टीने स्वत:चा वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न करेल का? तिला भावभावना मिळाल्या तर सोबत लोभ, मत्सर असे षङरिपूही मिळतील का? यांसारख्या शंकाही रास्त आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे उपयोग

हुशार, वेगवान, कार्यक्षम परिपूर्ण बुद्धिमत्ता प्रणाली माणसाला सहज बाजूला सारू शकतात. पण माणसाची काही वैशिष्ट्ये आहेत. व्यक्ती-व्यक्तीनुसार अनुभव, संदर्भ, मते, कला आणि कौशल्ये यांच्यात विविधता असते. माणसाला स्वतंत्र विचार, स्वतंत्र कल्पना, सृजनशीलता याचे प्रचंड महत्त्व असते. त्या बाबतीत परिपूर्ण बुद्धिमत्ता कुठे असेल सांगणे कठीण आहे. त्यामुळे काही बाबतीत माणसाचे महत्त्व अबाधित राहू शकते.

आणखी एक लक्षात घ्यायला हवे. परिपूर्ण बुद्धिमत्ता काही एका झटक्यात जन्माला येणार नाही. ती हळूहळू प्रगत होत जाणार आहे. त्यात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नियंत्रणाची संधी आहे. संशोधन योग्य मार्गावर आहे का पारखण्याची संधी आहे. निक बॉस्ट्रॉम या शास्त्रज्ञाचा आग्रह आहे, की परिपूर्ण बुद्धिमत्तेकडे सर्व माणसांना मान्य अशी मूल्ये हवीत. तिने नैतिक योग्यतेला महत्त्व दिले पाहिजे आणि नैतिक परवानगीच्या मर्यादेत राहिले पाहिजे. अशी बंधने निश्चितच ठरवता येतील. आयझॅक असिमोव्ह आणि इतर विज्ञान लेखकांनी रोबॉट्स वापरताना माणसाच्या सुरक्षेसाठी काही नियम मांडले आहेत. तशा नियमांचा परिपूर्ण बुद्धिमत्तेत अंतर्भाव करता येईल.

परिपूर्ण बुद्धिमत्ता अजून प्रत्यक्षात आलेली नसल्याने संशोधकांमध्ये अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण गंमत म्हणजे त्यामुळे या विषयावर अनेक बाजूंनी विचार होतो. विचारमंथनातून नव्या कल्पना उदयाला येतात. त्यातूनच परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके टाळण्याची योग्य दिशा मिळणार आहे.

– डॉ. मेघश्री दळवी                                                                                                            

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org                                                                                                                                    

संकेतस्थळ : http://www.mavipa.org