अ. पां देशपांडे
‘कुतूहल’च्या सर्व वाचकांचे या सदराच्या विसाव्या वर्षात सहर्ष स्वागत. यंदा आपण पाषाणांसंदर्भातील भूविज्ञान (जिऑलॉजी) या विषयाची माहिती घेणार आहोत. हा विषय निवडण्यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती असते.

पृथ्वी कशी निर्माण झाली, ती एकेकाळी कशी होती, हळूहळू पृथ्वीचे सांरचनिक भूपट्ट (टेक्टॉनिक प्लेट्स) कसे सरकत गेले आणि जगाचा आजचा नकाशा कसा तयार झाला, आज जिथे हिमालय आहे तिथे पूर्वी महासागर होता का, भूकंप कसे होतात, त्यांची तीव्रता कशी मोजतात, भूकंप त्सुनामीला कसे कारणीभूत ठरतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सदरातून देण्यात येतील.

हेही वाचा : कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अगणित शक्यता…

एकेकाळी या विषयाला भूगर्भशास्त्र म्हटले जात होते. आता त्याला भूविज्ञान का म्हटले जाते, जमिनीखाली मिळणारी खनिजे मानवाच्या गरजेनुसार वारंवार निर्माण होतात का, जमिनीखाली असलेले पाणी नेमके कुठे असते, ते शेकडो वर्षे तिथे राहिले तरी आपल्या उपयोगाचे असते का, या विज्ञानशाखेत संशोधन करणारी भारतातील संस्था कोणती, ती केव्हा स्थापन झाली, तिचे उद्देश कोणते, त्यात कोणकोणत्या परदेशी आणि भारतीय वैज्ञानिकांनी संशोधन केले, भूविज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्था कोणत्या, या शिक्षणाचा पुढे काय उपयोग होतात, अलीकडे या विज्ञानशाखेला उपग्रहांचा कसा उपयोग होतो, भारतात आणि जगात दरडी कोसळणे, गावेच्या गावे जमीनदोस्त होणे, घरांच्या भिंतींना तडे जाणे असे प्रकार का घडतात, हल्ली त्यांचे प्रमाण वाढले आहे का, बदलत्या हवामानाचा धरणीवर काय परिणाम होईल, मृद्संवर्धनासाठी म्हणजेच जमिनीची धूप होऊ न देण्यासाठी काय काय उपाय आहेत, जास्त वेगाने पाणी वाहून नेणाऱ्या ब्रह्मपुत्रेसारख्या नद्यांची पात्रे काठाची धूप होत असल्याने रुंद होत आहेत का, त्यामुळे काठावरच्या वस्तीला धोका निर्माण होत आहे का, त्यावर कोणते उपाय आहेत, असे नाना मुद्दे या सदरात हाताळले जातील. वाचकांनीही रोजचे सदर वाचल्यावर त्यांना पडलेले प्रश्न या सदराखाली दिलेल्या ई-मेलवर विचारून त्यांची उत्तरे लेखकांकडून मिळवावीत, जेणेकरून हे सदर परस्परसंवादी राहील.

अ. पां देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org