कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक प्रगत करण्यासाठी मानवी बुद्धी कसे काम करते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपली बुद्धी मर्यादित स्मृतीच्या कक्षेत काम करत असली तरी, आपण तिच्या जोरावर अचाट कामे करू शकतो हे एक नवल आहे.वस्तू खरेदी, प्रवास, पाठय़क्रम निवडणे अशा कित्येक बाबतीत मोठय़ा संख्येत पर्याय आपल्या समोर येत असतात आणि त्यातून एकाची निवड करणे हे आव्हान असते. त्या संदर्भात पर्यायांची संख्या मर्यादित करण्यावर आपली बुद्धी भर देते. म्हणजेच माहितीचा बोजा शिस्तबद्धपणे कमी केला जातो.  यासाठी आपण एक विशिष्ट धोरण वापरतो. ते म्हणजे, शक्यतो केवळ लक्षणीय बदल विचारात घेणे आणि त्यांचे महत्त्व ठरवून कृती करणे.

आपल्या मेंदूमध्ये याबाबत अवबोधपणे लक्ष गाळण प्रक्रिया होत असते. उदाहरणार्थ, दूरध्वनीवर तुमच्या मित्राच्या आवाजात बुद्धीला जाणवेल इतका बदल आढळल्यास तो तुमच्या लक्षात आणून दिला जातो आणि तुम्ही त्याप्रमाणे संवादाची दिशा ठरवता. तो आवाज तुमच्या स्मृतीमधील संग्रहित आवाजापेक्षा फारसा वेगळा नसल्यास, तुम्हाला त्याची दखल घेण्याची सूचना मिळत नाही.  त्यामुळे बदल लक्षात घेणे आणि त्यांचे महत्त्व ठरवणे ही दोन तत्त्वे आपल्या नैसर्गिक बुद्धीला वेगळेपण देतात. साध्या गोष्टी जसे चाव्या, पैसे किंवा पावती विसरणे, हे आपल्या आंतरिक लक्ष प्रणालीवर पडणाऱ्या प्रचंड ताण, यामुळे घडते. त्यावर उपाय म्हणून आपण बाह्य लक्ष प्रणालीची मदत घेतो.

नोकरचाकर किंवा स्वीयसचिव तसेच कुत्रेदेखील आपल्याला त्याबाबतीत मदत करतात. अशा प्रणाली आपले लक्ष केवळ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेधतात, ज्यामुळे मन एकाग्र होऊन उत्तमरीत्या कार्यरत होते. काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंकीय प्रणालींनी त्यांची जागा घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या आधारे आपण आपले मन सुसंघटित करू शकलो तर, अतिशय मोठा पल्ला गाठणे शक्य आहे. मात्र लक्षवेधी बदल नसलेल्या घटना किंवा माहिती विचारात घेता न येणे, हे एका अर्थाने संधी गमावणे असेही काही वेळा असू शकते.

प्रश्न आहे की, वरील दोन तत्त्वांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तादेखील आपल्यापुढे जाऊ शकेल का? मात्र मर्यादित स्मृतीमंजूषा आणि व्यापक अनुभवाचा अभाव, हे तिच्या क्षमतेला चाप लावू शकतात, असे सध्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. विवेक पाटकर,मराठी विज्ञान परिषद