मुंबईच्या रस्त्यांविषयी नेहमीच, पण खास करून पावसाळय़ात, नागरिकांकडून बरीच टीका होत असते. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्डय़ांमध्ये अधूनमधून रस्ता आहे, असा उपहासात्मक प्रश्नच विचारला जातो. त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना वेळीच खड्डय़ाची जाणीव न झाल्यामुळे अनेक अपघात होतात. त्यात वाहनांचं तर नुकसान होतंच पण जीवितहानी होण्याचीही दाट शक्यता असते. वाहनाचं सारथ्य करणाऱ्या वाहकानं कितीही डोळय़ात तेल घालून चालवण्याचं ध्येय ठेवलं तरी त्यालाही खड्डे चुकवणं नेहमीच शक्य होत नाही.

हे खड्डे बुजवून सपाट गुळगुळीत रस्ता होईल तेव्हा होईल, तोपर्यंत तरी वाहकाला मदत करणारं, खड्डय़ांची वेळीच जाणीव करून देणारं तंत्रज्ञान का उपलब्ध करून दिलं जाऊ नये, असा विचार जपानमधील काही वैज्ञानिकांनी केला आहे. खरं तर त्या देशातील रस्त्यांना खड्डय़ांचं ग्रहण लागलेलं नाही. तरीही रस्ते संपूर्ण सुरक्षित असावेत या विचारानं त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा, खास करून त्यातील डीप लर्निग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं. प्रथम खड्डय़ांची ओळख पटवणारे इलेक्ट्रॉनिक संवेदक त्यांनी तयार केले. ते वाहनाच्या तळाशी बसवल्यानं ते सातत्यानं जागच्या जागीच त्या रस्त्याच्या स्वरूपाची अचूक माहिती मिळवू शकले. तेही अशा रीतीनं बसवलं गेलं की खड्डय़ाजवळ पोहोचण्यापूर्वीच ही माहिती मिळवून ती वाहनातील त्याच्याशी निगडित संगणकाकडे पाठवण्यात येत होती. ज्याला रिअल टाइम इन्फर्मेशन गॅदिरग म्हणजे त्या क्षणीच ती माहिती मिळवण्याचं तंत्र म्हणतात, ते वापरलं जात होतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश असलेल्या संगणकाकडून त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं. त्यावरून ज्या पृष्ठभागावरून वाहन जात आहे तो सपाट आहे की उंचसखल आहे, आणि मुख्य म्हणजे तिथं खड्डा आहे की काय याची माहिती वाहनयंत्रणेला दिली जात होती. तिचा वापर करून एक तर वाहकाला योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना वेळीच दिली जात होती. त्याच्याकडून त्यानुसार पर्याप्त उपाययोजना न केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वयंचलितरीत्या वाहन त्या खड्डय़ाला चुकवून पुढं जाईल, अशा आज्ञाही त्या कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त संगणकाकडून वाहनाच्या नियंत्रण केंद्राला दिल्या जात होत्या. खड्डय़ांना चुकवून गाडी पुढं सरकत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाळ फोंडके,मराठी विज्ञान परिषद