‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे’ उक्तीला साजेसे शरीर आणि वर्तन असणारे टेरीडो नॅव्हॅलिस हे प्राणी ‘मृदुकाय’ प्राणिसंघात मोडतात. त्यांचे द्विपुटी शरीर मऊ, लिबलिबीत असते. तरीही ते जहाजाचे लाकूड पोखरतात, म्हणून त्यांना ‘शिपवर्म’ म्हणतात. स्वत:च्या छोटा अंगठीच्या आकाराच्या पांढऱ्या, द्विभाजित शिंपल्यामुळे ते लाकडात बिळे करतात. ते अंग आक्रसतात तेव्हा शिंपले बिळाच्या तोंडाशी गच्च अडकून बीळ बंद होते. बंद बिळात काही न खाता-पिता टेरीडो दीड महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात. गलबते किनाऱ्याला लागतात त्या धक्क्याचे दगडही शिपवर्म पोखरू शकतात. मऊ अंगाभोवती कॅल्शिअम काबरेनेटचे कडक आवरण त्यांच्या त्वचेतूनच स्रवते.
प्राचीन काळापासून गलबताचे लाकूड पोखरणारे मृदुकाय प्राणी ज्ञात आहेत. त्यातील टेरीडो नॅव्हॅलिस हा सर्वदूर पसरलेला प्राणी आहे. १५०३ मध्ये त्यांनी ख्रिस्तोफर कोलंबसच्या आरमारातील दोन जहाजांचे तळभाग, मधमाशांचे पोळे वाटावे इतके पोखरले होते. ती जहाजे बुडाली हे सांगायलाच नको. टेरीडो हे एकही तोफगोळा न डागता बोटी बुडवणारे प्राणी आहेत. टेरीडो प्रजातीतील निदान २० जाती सध्या माहीत आहेत. टेरीडो जहाजाचे लाकूड खातात.
बंदरे, धक्के, बांध, कुंपणे अशा ‘जेथे सागरा धरणी मिळते’ तेथील लाकूडही कुरतडून खातात. लाकडात सेल्युलोज पचवणारे सेल्युलोज विकर, टेरीडोना बनवता येत नाही. पण त्यांच्या श्वसनांगातल्या क्लोम-गिल्समध्ये वसणारे जिवाणू सेल्युलोजची निर्मिती करतात. शरीरातील निवासी जिवाणू शिपवम्र्सना सेल्युलोज पचवून देतात. टेरीडो दगड पोखरतात. त्यातील असेंद्रिय पदार्थापासून (हायड्रोजन सल्फाईड) ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना निवासी जिवाणू उपयोगी पडतात. फिलिपाइन्समध्ये पाच फुटांपर्यंत लांबीचे कार्बनी संयुगे न मिळाल्यास दगड पचवणारे अद्भुत जीव आढळतात. ‘टेरीडो’सम प्राणी अभ्यासासाठी विलक्षण आहेतच, शिवाय लाकूड पोखरून इतर जीवांना ते आयती घरे पुरवितात. आणखी रंजक बाब म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीला ते अळी म्हणून पोहणारे जीव असतात. नंतर नर म्हणून जगतात. शुक्राणू तयार करतात. प्रौढपणी मादी होऊन स्त्रीबीजे निर्मितात. एकाच व्यक्तीच्या जीवनावस्थांत पोहणारे-बैठे, नर-मादी असे गुण दाखवणारे दुर्मीळ जीव म्हणजे टेरीडो!
नारायण वाडदेकर, मराठी विज्ञान परिषद