फेसबुकवर आपण टाकलेल्या फोटोमधल्या आपल्या मित्राला फेसबुक स्वत:च टॅग करते आणि आपल्याला फक्त त्याची पुष्टी करायला सांगते. आपला मोबाइल फोन आपला चेहरा ओळखून आपोआप अनलॉक होतो. त्याच फोनमधले ‘सिरी’ किंवा ‘गूगल असिस्टंट’ सारखे अ‍ॅप आपण तोंडी दिलेली आज्ञा समजून घेऊन क्षणात तिची अंमलबजावणी करतात. आपण आजवर ‘अ‍ॅमेझॉन’वर चाळलेल्या पुस्तकांवरून अ‍ॅमेझॉन आपल्यासाठी वाचायला आवडतील अशी पुस्तके सुचवतो किंवा आपण ‘नेटफ्लिक्स’वर आजवर बघितलेल्या चित्रपटांवरून नेटफ्लिक्स आपल्यासाठी बघायला योग्य असा चित्रपट सुचवतो.

या सर्व अचंबित करणाऱ्या कृतींमागे कृत्रिम बुद्धिमत्तेची जी प्रणाली काम करते त्या प्रणालीला ‘सखोल शिक्षण’ (डीप लर्निग) असे म्हणतात. यंत्रशिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक अशी उपशाखा आहे, ज्यात उपलब्ध विदेच्या माध्यमातून यंत्र शिकते. सखोल शिक्षण ही या यंत्रशिक्षणाची एक उपशाखा आहे. सखोल शिक्षण या प्रणालीत माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने, म्हणजे ‘न्यूरल नेटवर्क’च्या माध्यमातून यंत्राला विचार करायला शिकवले जाते. 

हेही वाचा >>> कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो, तेव्हा क्षणार्धात आपल्या शरीरात अनेक गोष्टी घडतात. डोळयांनी पाहिलेली त्या व्यक्तीची प्रतिमा जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचते, तेव्हा आपल्या स्मृतीत असलेल्या असंख्य प्रतिमांशी ती प्रतिमा ताडून पाहिली जाते. ती जुळली तर त्या माणसाची ओळख पटते. पण एखादा माणूस या आधी आपल्याला भेटला होता तेव्हा तो तरुण असू शकतो, तो शरीराने स्थूल किंवा कृष झालेला असू शकतो, त्याची वेशभूषा किंवा केशभूषा आमूलाग्र बदललेली असू शकते. असे काहीही असले तरी मानवी मेंदू क्षणार्धात योग्य ती प्रक्रिया करून त्या व्यक्तीची ओळख पटवतो. ही मानवी बुद्धिमत्तेची कार्यप्रणाली आणि बोधन प्रक्रिया (कॉग्निटिव्ह प्रोसेस) जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अनेक वर्षे करत आहेत. परंतु त्यांना आजवर पूर्णपणे यश आलेले नाही. पण हे निश्चित आहे की ही प्रक्रिया मानवी शरीरातील नैसर्गिक चेतापेशींच्या जाळयाच्या (न्युरल नेटवर्कच्या) माध्यमातून होते. या नेटवर्कच्या मूलभूत घटकाला ‘न्युरॉन’ असे म्हणतात आणि एका नैसर्गिक न्यूरल नेटवर्कमध्ये अनंत न्युरॉन्स असतात.

निसर्गाच्या या रचनेची नक्कल करून यंत्राला शिक्षण देण्याचा प्रयत्न सखोल शिक्षणात केला जातो. यासाठी कृत्रिम चेतापेशींच्या जाळयाचा (आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा) वापर केला जातो.

–  मकरंद भोसले

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org