मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अग्नीच्या वापराची सुरुवात. मानवाने अग्नीचा वापर सुरू केल्याचा निश्चित स्वरूपाचा, सर्वांत जुना पुरावा हा दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे. परंतु सुमारे चार-पाच लाख वर्षांपूर्वीच्या, निअँडरथालसारख्या मानवसदृश प्रजातींनीही अग्नीचा वापर केल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत. आता तर त्याच्याही खूपच पूर्वीचा, अग्नीच्या वापराचा पुरावा सापडला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण शोध लागण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता कारणीभूत ठरली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : खनिजांचे वितळणबिंदू

इस्रायलमधील एव्हरॉन क्वॉरी इथल्या उत्खननात आठ ते दहा लाख वर्षांपूर्वीचे, काही प्राण्यांचे अवशेष, तसेच गारगोटीपासून तयार केलेली शिकार कापण्यासाठी वापरता येणारी, अणकुचीदार आणि धारदार साधने सापडली. यांत एक अर्धवट जळालेला सुळाही (दात) सापडला. या अर्धवट जळालेल्या सुळ्याचे स्वरूप, तिथे अग्नीचा वापर केला गेल्याची शक्यता दर्शवत होते. या शक्यतेतील यथार्थता पडताळण्यासाठी संशोधकांनी, इथे सापडलेली गारगोटीपासून तयार केलेली साधने उच्च तापमानाच्या संपर्कात आली होती का, हे तपासायचे ठरवले. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रथम या संशोधकांनी इस्रायलमधील विविध ठिकाणांहून गोळा केलेले गारगोटीचे तुकडे घेतले आणि ते ८०० अंश तापमानापर्यंतच्या विविध तापमानांना तापविले. हे तुकडे थंड झाल्यानंतर, त्यावर अतिनील किरणांचा मारा करून विखुरलेल्या किरणांचे वर्णपट घेतले. या वर्णपटांद्वारे, गारगोट्यांच्या तुकड्यांत उष्णतेमुळे झालेले बदल समजू शकले. या बदलांचे स्वरूप तापमानानुसार वेगवेगळे होते. वर्णपटांद्वारे मिळवलेली ही सर्व माहिती या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पुरवून तिला प्रशिक्षित केले.

यानंतरच्या टप्प्यात या संशोधकांनी उत्खननात सापडलेल्या तुकड्यांवर अतिनील किरणांचा मारा करून त्यांचे वर्णपट घेतले व हे वर्णपट त्या प्रशिक्षित संगणकाला पुरवले. या वर्णपटांवरून, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने हे तुकडे वेगवेगळ्या तापमानांच्या संपर्कात आले असल्याचे स्पष्ट झाले. यांतील काही तुकडे तर ५०० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाला सामोरे गेले होते. गारगोट्यांच्या तुकड्यांचा हा इतिहास, तिथे अग्नीचा वापर केला गेल्याचे स्पष्टपणे दर्शवत होता. या तुकड्यांच्या काळावरून, अग्नीचा वापर आठ ते दहा लाख वर्षांपूर्वी झाला असल्याचे स्पष्ट झाले. हा काळ मानवाच्याच नव्हे, तर निअँडरथाल या मानवाच्या भाऊबंदांच्याही जन्मापूर्वीचा होता. त्याआधारे होमो इरेक्टस या मानवपूर्व प्रजातीने अग्नीचा वापर केला असण्याची शक्यता दिसून आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठीही करता येत असल्याचे या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकेंतस्थळ : : http://www.mavipa.org