सुमारे १९६०-७० या दशकातला तो काळ! भारत विज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रांत नव्या उमेदीने वाटचाल करत होता; परंतु सूक्ष्मजीव पोषणमाध्यमांच्या निर्मितीत मात्र एक मोठी पोकळी होती. त्यासाठी त्या काळी संपूर्ण देश परदेशी कंपन्यांवर अवलंबून होता. या माध्यमांची किंमत सोन्याच्या दरांपेक्षाही अधिक होती! अशा काळात एका दूरदृष्टी असलेल्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाने या स्थितीला थेट आव्हान दिलं. डॉ. गंगाधर वारके यांनी ‘हायमीडिया’ ही संकल्पना मांडली. भारतातच सूक्ष्मजीव पोषणमाध्यमांची निर्मिती सुरू करण्याचा ठाम निर्धार केला.
‘हायमीडिया लॅबोरेटरीज’ या संपूर्णत: भारतीय कंपनीने या सूक्ष्म व महत्त्वपूर्ण पोषणगरजांचे अचूक भान ठेवले आणि सूक्ष्मजीव विज्ञानाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. १९७४ साली डॉ. गंगाधर वारके, त्यांच्या पत्नी सरोज वारके आणि बंधू विष्णू वारके यांच्या सहकार्याने ‘हायमीडिया’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. परदेशी उत्पादनांवर अवलंबून न राहता स्वदेशी पोषणमाध्यमे व त्यास पूरक उत्पादने तयार करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. अवघ्या पाच उत्पादनांनी सुरू झालेली ही प्रयोगशील वाटचाल आज २० हजारांहून अधिक जैव-उत्पादनांपर्यंत विस्तारली आहे.
हायमीडियाच्या क्रोमोजेनिक माध्यमांद्वारे अन्न व जलपरीक्षणातील कोलिफॉर्म व ई. कोलाय यांची जलद व अचूक ओळख शक्य झाली. एलजे व एमजीआयटी माध्यमांनी क्षयरोगजनक मायकोबॅक्टेरियाच्या संवर्धनात नवे मापदंड प्रस्थापित केले. समुद्रससपाटीखालचे अॅक्टिनोबॅक्टेरिया, आर्क्टिकच्या बर्फाळ भूमीतील प्रजाती, तसेच उष्ण झऱ्यांमधील उष्णताप्रेमी सूक्ष्मजीव यांचे यशस्वी संवर्धन ही हायमीडियाच्या विशेष पोषणमाध्यमांची शास्त्रीय कमाल ठरली आहे.
कोविड-१९ महामारीच्या काळात कंपनीने कोट्यवधी ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम’ (व्हीटीएम) टेस्टकिट्स व ‘आरएनए’ निष्कर्षण टेस्टकीट्स देशभर वितरित करत भारताच्या जैवतांत्रिक आत्मनिर्भरतेला खंबीर पाठबळ दिले. हायमीडियाने पेशी-संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली.
सेल व मॉलेक्युलर बायोलॉजी, प्लांट टिश्यूकल्चर आणि फॉरेन्सिक विज्ञानसारख्या क्षेत्रांतही हायमीडियाचे योगदान उल्लेखनीय आहे. या प्रयोगशाळेला सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ‘विज्ञान आणि औद्याोगिक अनुसंधान विभाग’ची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. एटीसीसी या अमेरिकेच्या प्रथितयश कंपनीशी त्यांची भागीदारी आहे. आज या प्रयोगशाळेचे जाळे १५० देशांत पसरलेले आहे. येथे १४७ शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. जगभर सूक्ष्मजीवांपासून सुरू झालेल्या प्रवासात ‘मेड इन इंडिया’ संकल्पनेचा खरा गौरव म्हणजेच ‘हायमीडिया’! भारतीय जैववैज्ञानिक सामर्थ्याचं जागतिक प्रतीक!
– डॉ. गिरीश महाजन
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org