पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली असेल, याचे स्पष्टीकरण देताना, संशोधक मीलर आणि युरे यांनी गृहीत धरलेल्या त्यावेळेच्या पृथ्वीवरील वातावरणाच्या घटकांवरच काही प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत! मीलर आणि युरे यांच्या प्रयोगात मिथेन, हायड्रोजन, अमोनिया आणि पाण्याची वाफ यांचे मिश्रण म्हणजे पृथ्वीवरील मूळ वातावरण होते, असे गृहीत धरले आहे. या मिश्रणात विजेचा स्पार्क घडवून आणून विजांचा कडकडाट निर्माण केला गेला आणि त्यातून अॅमिनो आम्ले तयार झाली. त्या वातावरणात प्राणवायू हा जवळजवळ नव्हताच, असे गृहीत धरले आहे. आता हा सिद्धांत बऱ्याच शास्त्रज्ञांनी अमान्य केला आहे.

रिचर्ड वुल्फेंडेन आणि चार्ल्स कार्टर यांनी २०१५ साली ‘पेप्टाइड-आरएनए’ गृहीतक मांडले. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स’ यात ‘आरएनए वर्ल्ड’ सिद्धांतावर त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जलाशयांत सजीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे रासायनिक घटक होते. त्याला ‘प्रायमोर्डियल सूप’ असे म्हटले जाते. जनुकांतील संकेतक्रम, नियमन आणि गुणधर्म अभिव्यक्तीकरण ही महत्त्वाची कामे करणारा प्रगत रेणू ‘आरएनए’ हा ‘प्रायमोर्डियल सूप’मधील अॅमिनो आम्ल आणि आकाशातील रसायनांच्या अभिक्रियेतून कसा तयार झाला, त्याने पुढे प्रथिने कशी निर्माण केली आणि एकपेशीय जीवाची निर्मिती कशी झाली; याचा उलगडा ‘आरएनए वर्ल्ड’ सिद्धांतात केला आहे.

अशा प्रकारचे प्रगत रेणू अस्तित्वात येण्यापूर्वी तीन महत्त्वाच्या प्रक्रियांचा समन्वय साधणे आवश्यक असते. एक म्हणजे अॅमिनो आम्लाचे भौतिक गुणधर्म, दुसरे जनुकीय संकेत (जेनेटिक कोड) आणि तिसरे प्रथिनाचा गुणधर्म ठरवणाऱ्या प्रथिनातील घड्या. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत या तिघांतील समन्वय हाच कळीचा मुद्दा होता. वैज्ञानिकांच्या मते ३.६ अब्ज वर्षापूर्वी, सर्व जीवसृष्टीचा उगम असणारा एकमेव शेवटचा ‘वैश्विक सर्वसाधारण पूर्वज’ ज्याला ‘लास्ट युनिव्हर्सल कॉमन अॅन्सिस्टर’ (लुका) असे म्हटले जाते, तो जन्माला आला. ४.६ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला असे मानले तर, ३.६ ते ४.६ या एक अब्ज वर्षात नेमके काय झाले असावे, याचा वेध घेण्यासाठी रिचर्ड आणि चार्ल्स यांनी सूक्ष्मसंशोधन केले.

रिचर्ड यांच्या मते, जनुकीय संकेतांची प्रक्रिया दोन स्वतंत्र मार्गांनी विकसित झाली असावी. त्या जीवाने आपले कार्य दोन प्रकारच्या बहुसूत्री संयुगांची (पॉलिमर्स) निर्मिती करून विभागले असावे. एक प्रथिनांच्या निर्मितीसाठी आणि दुसरे न्यूक्लिक आम्लांच्या निर्मितीसाठी. त्यामुळे जीवन केवळ आरएनएवर आधारित नसून, पेप्टाइड्स (लघुप्रथिने) आणि आरएनए यांच्या प्रक्रियांतून विकसित झाले असावे, हे सिद्ध झाले.

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org