scorecardresearch

कुतूहल : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था

संस्थेत पदवी-पदव्युत्तर आणि पदव्युत्तर-डॉक्टरेट अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने शिकता येतात

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने पारंपरिक विचारसरणीच्या व शैक्षणिक सीमांच्या पलीकडे शिक्षण व संशोधन व्हावे, यासाठी एकूण सात स्वायत्त ‘भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था’ स्थापन केल्या आहेत. या संस्था भोपाळ, बेरहमपूर (ओदिशा), मोहाली, कोलकाता, तिरुवनंतपुरम, तिरुपती आणि पुणे येथे आहेत. त्यापैकीच ‘भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च) ही संस्था मूलभूत विज्ञानातील संशोधन आणि अध्यापनाला समर्पित आहे. प्रा. जयंत बी. उदगावकर हे २००६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुणे येथील संस्थेचे सध्याचे संचालक आहेत. ही ‘महत्त्वाची राष्ट्रीय संस्था’ असल्याचे वर्ष २०१२ मध्ये घोषित करण्यात आले. संस्था अनोखे शैक्षणिक उपक्रम राबवते. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांतील वैज्ञानिक कुतूहल आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात येते आणि त्याला अत्याधुनिक संशोधनाचीही जोड दिली जाते.

‘भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थे’त जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भू- आणि हवामान विज्ञान, गणित आणि भौतिकशास्त्र या निसर्गविज्ञानाशी संबंधित विषयांवर आधारित अद्ययावत शिक्षण दिले जाते. संस्थेत पदवी-पदव्युत्तर आणि पदव्युत्तर-डॉक्टरेट अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने शिकता येतात. येथे उपलब्ध विषयांमध्ये तसेच आंतरविद्याशाखीय क्षेत्रांमध्येही संशोधनाच्या मुबलक सोयी उपलब्ध आहेत.

येथे शिकवल्या जाणाऱ्या विविध विद्याशाखांतील मुख्य प्रवाहातील संशोधनाव्यतिरिक्त, निवडक क्षेत्रांमध्ये सखोल संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणारी राष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्रेदेखील स्थापन करण्यात आली आहेत. ‘डीबीटी अधिवास उत्कृष्टता केंद्र’, ‘नॅशनल फॅसिलिटी फॉर जीन फंक्शन इन हेल्थ अ‍ॅण्ड डिसीज’, ‘विज्ञान आणि गणित शिक्षण उत्कृष्टता केंद्र’, ‘ऊर्जा विज्ञान केंद्र’, ‘जल संशोधन केंद्र’ आदींचा त्यात समावेश आहे. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे ही ‘इंडिगो कन्सॉर्शियम’ या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संशोधन समूहाची सदस्य संस्था आहे.

संस्थेत प्रतिष्ठित व अनुभवी प्राध्यापक व शास्त्रज्ञ आहेत, आधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे सचोटी, निष्पक्षता, प्रतिष्ठा आणि व्यावसायिकतेवर आधारित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात संस्थेला यश आले आहे.

– प्रा. उल्हास का. पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta kutuhal indian institute of science education and research zws