जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी जेव्हा जमिनीखाली झिरपून, जमिनीखालच्या खडकात म्हणजेच जलधरात प्रवेश करते, तेव्हा त्याला भूजल असे संबोधले जाते. हे पाणी खडकात (जलधर) एकाच ठिकाणी साठून राहात नाही तर त्याचे जमिनीखाली विशिष्ट पद्धतीने वितरण झालेले असते. या वितरणाला भूजलाचे ऊर्ध्व वितरण (व्हर्टिकल डिस्ट्रिब्यूशन) असे म्हणतात. या पाण्याचे जमिनीखालील वितरण क्षेत्र हे मुख्यत: दोन भागांचे बनलेले असते. जमिनीच्या पृष्ठभागालगत असणाऱ्या भागाला ‘असंपृक्त क्षेत्र’ असे म्हणतात. या क्षेत्रात जलधराच्या पोकळ्यांमध्ये काही प्रमाणात हवा आणि काही प्रमाणात पाणी असते. म्हणून याला ‘वायुमिश्रित क्षेत्र’ (एअरेटेड झोन) असेही म्हटले जाते.
या असंपृक्त क्षेत्राचे पुन्हा तीन उपविभाग पडतात. या क्षेत्राचा पहिला उपविभाग म्हणजे मृदाजल क्षेत्र (सॉइल वॉटर झोन). यात मातीमिश्रित पाणी असते. मातीतील ओलाव्यावर या क्षेत्रातील पाण्याचे प्रमाण ठरते. मातीत ओलावा अगदीच कमी असेल तर हे क्षेत्र अस्तिवात राहू शकत नाही.
या क्षेत्रानंतर अधिभौम जलक्षेत्र (व्हॅडोज वॉटर झोन) असते. मृदाजल क्षेत्र संपल्यानंतर हे क्षेत्र सुरू होते. तिथून केशिकाबिंदू क्षेत्राच्या सुरुवातीपर्यंत या क्षेत्राचा विस्तार असतो. या क्षेत्रात खडकातील पोकळ्यांमध्ये अधिभौम जल (व्हॅडोज वॉटर) हे केशिका बलाच्या प्रभावाखाली अस्तित्वात असते.
या क्षेत्रानंतर केशिकीय क्षेत्र असते. हे क्षेत्र संपृक्त जलक्षेत्राच्या वरच्या बाजूस असते. केशिकीय बलाने संपृक्त जलक्षेत्रातील पाणी त्याच्या वरच्या बाजूकडे असणाऱ्या या केशिकीय क्षेत्रात वर येत राहते. या क्षेत्राची रुंदी व अस्तित्व हे विशिष्ट प्रदेशातील मातीच्या प्रकारावर अवलंबून असते. एखाद्या ठिकाणची माती जर अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेली असेल तर त्या मातीत हे केशिकीय क्षेत्र तयार होते. मोठ्या कणांनी बनलेल्या मातीत असे क्षेत्र आढळून येत नाही.
संपृक्त जलक्षेत्राच्या वरच्या पातळीला भूजलपृष्ठ असे म्हणतात. असंपृक्त क्षेत्र व संपृक्त क्षेत्र यामधील सीमेचे काम भूजलपृष्ठ करते. संपृक्त जलक्षेत्रात खडकातील (जलधर) सर्व पोकळ्या या पाण्याने भरलेल्या असतात. त्यांच्यावर जलस्थितिक दाब कार्य करत असतो. या क्षेत्रातील पाण्याचे प्रमाण हे खडकाच्या सच्छिद्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असते. खडकाची सच्छिद्रता जेवढी जास्त असेल, तेवढे त्यात साठलेल्या पाण्याचे प्रमाण अधिक असते. या क्षेत्रात असणाऱ्या पाण्याला खऱ्या अर्थाने भूजल मानले जाते. भूजल अन्वेषणामध्ये आणि कूपनलिका खोदताना संपृक्त क्षेत्राचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते.
– डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org