व्हेल शार्क म्हटले की मन संभ्रमात पडते. व्हेल हा तर सस्तनी आणि शार्क कास्थिमत्स्य. मात्र व्हेल शार्क म्हणजे पृथ्वीवर जगणारा आकाराने सर्वात मोठा शार्क, १४ मीटर लांबीचा आणि सरासरी १२ टन वजनाचा कास्थिमत्स्य संकटग्रस्त ठरला आहे. याला देवाचा मासा म्हणणारे कोळी बांधव आपल्या बोटीच्या आसपास हा दिसला तर त्याला उदबत्ती ओवाळून, नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. 

हेही वाचा >>> कुतूहल : प्रवाळसंवर्धनासाठी ध्वनीचा वापर

या वैशिष्टय़पूर्ण माशाच्या मुखात असलेले दात केवळ सहा मिलिमीटर इतके अतिशय छोटे असतात. त्याची त्वचा ठरावीक रचना दर्शवते. माणसाच्या हाताच्या ठशासारखी ही आकृती भासते. तुलनेने उथळ पाण्यात असून यांची पोहोण्याची गती मंद असते. या दोन्ही कारणांस्तव त्यांची प्रजाती मानवी हल्ल्यांपासून असुरक्षित ठरते. त्यांना ५० मीटर खोल पाण्यात राहणे आवडते, मात्र हजार मीटर खोलीतही ते बुडी मारून जातात. प्रति तास पाच किलोमीटरच्या वेगाने पोहताना अनेकदा त्यांची बोटीबरोबर टक्कर होते. आज जगभरात केवळ काही हजार व्हेल शार्क शिल्लक आहेत. शिकार, बोटींची धडक, जाळय़ात अडकणे अशा कारणांनी हे जीव संपुष्टात येत आहेत. याशिवाय प्लास्टिक तोंडावाटे पचनसंस्थेत गेल्यामुळे काही व्हेल शार्क मृत्युमुखी पडतात. प्लास्टिक अडकल्यामुळे त्यांचे खाणे बंद होऊन उपासमारीने मृत्यू होतो. त्यांच्या परांना आणि मांसाला जास्त मागणी असल्यामुळे त्यांची कत्तल होते. त्यामुळे या दुर्मीळ जातीवर घातक परिणाम होऊ लागले आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल: बहुविध धातूंचे गोळे

व्हेल शार्क प्रजातीच्या रक्षणासाठी २०१६ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेने (आययूसीएन) संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून सन २०१२ पासून ३० ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांची जगभरातील संख्या वाढावी, म्हणून या

दिवशीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजमाध्यमे, ब्लॉगलेखन, भाषणे, परिषदा, अशा विविध मार्गानी या प्राण्याचे महत्त्व आणि त्याला वाचवायची निकड अधोरेखित करणे हे आपले कर्तव्य आहे. या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी सुज्ञ माणसांनी एकत्र येऊन त्यांना अभय देणे गरजेचे आहे. 

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org