१८ मे हा दिवस ‘जागतिक दर्यावर्दी जीवनात महिला’ या संकल्पनेला समर्पित केला गेला आहे. २०२२ साली हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला. जागतिक नौवहनाचे नियंत्रण करणाऱ्या (इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन- आयएमओ) या संस्थेचा हा उपक्रम आहे. आयएमओ ही संयुक्त राष्ट्र संघाची एक शाखा आहे. या संस्थेने जागतिक पातळीवर केलेल्या पाहाणीतून काही बाबींची नोंद घेतली आहे. त्यांच्या पाहाणीनुसार ज्या समाजामध्ये, उद्योगांमध्ये किंवा देशांमध्ये महिलांच्या सहभागाला महत्त्व दिले जाते त्या समाजाची, उद्योगांची किंवा देशाची आर्थिक प्रगती अधिक जोमाने होते. महिला उच्चपदांवर कार्यरत असलेल्या उद्योगांची कार्यक्षमता इतरांपेक्षा जास्त असते. महिलांचा सहभाग असलेले तहनामे अधिक काल अबाधित राहतात. ज्या देशांच्या विधिमंडळांमध्ये अधिक महिलांना स्थान दिलेले असते, तिथे अधिक लोकहितदक्ष कायदे करण्याकडे कल असतो. या सर्व बाबींचा विचार करून आयएमओने व्यापारी नौवहनात महिलांचा सहभाग प्रयत्नपूर्वक वाढविण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांना १९८८ साली सागरी नौवहनामध्ये सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. आज जगातल्या एकूण दर्यावर्दी कर्मचाऱ्यांपैकी फक्त १.२ टक्के म्हणजेच सुमारे २४ हजार महिला आहेत. ही संख्या कमी असली, तरी गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे. आजवर ‘स्त्रीविरहित’ असलेल्या या उद्योगामध्ये स्त्रियांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. आयएमओचे या संदर्भातील ‘प्रशिक्षण- प्रसिद्धी- मान्यता’ हे ब्रीदवाक्य आहे. या योजनेद्वारे महिलांना नौवहन क्षेत्रात समुद्रावर आणि किनाऱ्यावर त्यांच्या योग्यतेप्रमाणे पदे दिली जातील. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्त्री-पुरुष समानतेच्या उद्दिष्टांपैकी हे एक आहे. 

समानतेचा हा कार्यक्रम राबवण्यासाठी आयएमओ विकसनशील देशांमध्ये महिलांना उच्च दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांना समुद्रावर, तसेच व्यवस्थापकीय स्वरूपाच्या नोकऱ्या करण्यासाठी उत्तेजन दिले जाते. महिलांचा सहभाग १.२ टक्क्यांवरून येत्या पाच वर्षांत ५० टक्क्यांवर नेण्याचा निश्चय काही जहाज परिवहन कंपन्या आणि इतर कंपन्यांनी केला आहे. या नव्या पुढाकाराला यश मिळून नौवहन उद्योगाची अधिकाधिक प्रगती होत राहील हा विश्वास आज या ‘दर्यावर्दी जीवनातील महिलां’च्या जागतिक दिनी सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

– कॅप्टन सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal international day for women in maritime zws
First published on: 18-05-2023 at 04:26 IST