घरातल्या खुर्चीवर कपड्यांचा ढीग पडला आहे. त्यातले काही कपडे धुवायचे आहेत. काही घडी करून कपाटात ठेवायचे आहेत आणि हे सारे करण्यासाठी तुम्हाला वेळ नाही. अशा वेळी ही कामे करणारा यंत्रमानव तुम्हाला कोणी भेट म्हणून दिला तर किती मजा येईल! आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जी प्रचंड क्रांती झाली आहे त्यामुळे घरातील निरस, कंटाळवाणी कामे करणारे यंत्रमानव तयार करणे आता शक्य झाले आहे. हे काम सोपे नाही. यासाठी आपण यंत्रमानवाला ज्या आपल्या नेहमीच्या भाषेत आज्ञा देतो त्या त्याला कळतील, याची व्यवस्था करावी लागते. याचा अर्थ यंत्रमानवाला नैसर्गिक भाषा प्रक्रिया ‘‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’’ शिकवावे लागते. यासाठी त्याच्यामध्ये प्रचंड मोठी माहिती साठवून तिचे विश्लेषण करण्याची क्षमता असावी लागते.

हेही वाचा >>> कुतूहल : औद्योगिक यंत्रमानव

घरातील वेगवेगळी कामे करण्याचे प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेले असते, म्हणजे आपल्या मेंदूतली न्युरल नेटवर्क्स जशी प्रशिक्षित केली जातात, तशीच यंत्रमानवातील कृत्रिम न्युरल नेटवर्क्स प्रशिक्षित करावी लागतील. हे काम खूपच गुंतागुंतीचे असते. अलीकडे यंत्रमानवाला प्रशिक्षित करण्याचे काम सोपे जावे म्हणून आयफोनला एक स्टिक जोडली जाते. ही स्टिक एखादे काम एखादा माणूस कसा करतो हे पाहून ते रेकॉर्ड करते आणि हे रेकॉर्डिंग यंत्रमानवाला पुरवले जाते. या रेकॉर्डिंगवरून तो स्वत:च ते काम शिकतो. कोणतेही काम करताना एखादा माणूस कोणत्या हालचाली आणि हातवारे करतोय याचे निरीक्षण कॅमेराद्वारे करून त्यापासून ते काम करण्याचा अल्गोरिदम तयार केला जातो आणि तो यंत्रमानवाच्या स्मृतीत साठवला जातो. या अल्गोरिदमला ‘जेश्चर रेकग्निशन अल्गोरिदम’ म्हणतात. या अल्गोरिदममुळे यंत्रमानव ते काम शिकतो.

हेही वाचा >>> कुतूहल: यंत्रमानवाची वाटचाल

घराची साफसफाई करणे, बागेतले तण काढणे, घरासमोरचा बर्फ झाडून टाकणे अशी अनेक कामे यंत्रमानव आता प्रभावीपणे करू शकेल. अलीकडे चक्क स्वयंपाक करण्यासाठीसुद्धा हळूहळू यंत्रमानवाचा वापर होऊ लागला आहे. हा यंत्रमानव पदार्थ कसे तयार करतात याचे निरीक्षण करून स्वत: ते पदार्थ तयार करण्यास शिकतो. वेगवेगळे पदार्थ करताना प्राथमिक तयारी काय करावी; कोणती भांडी वापरावीत; ओव्हन किंवा गॅस किती वेळ सुरू ठेवावा; हे सारे एकदा प्रोग्रॅम केले की यंत्रमानव अतिशय उत्तम स्वयंपाक करू शकतो.

आश्चर्य म्हणजे इस्त्री करण्याचे अतिशय कंटाळवाणे काम मात्र यंत्रमानवाला अजून नीट जमलेले नाही. त्यामुळे जिथे मनुष्यबळाची कमतरता असेल, तिथे घरातील बरीचशी कामे जर यंत्रमानवांनी केली तर त्यांना अनेकजण धन्यवाद देतील.– प्रा. माधवी ठाकूरदेसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org