अग्नी हा मानवाचा आदिम शोध म्हटलं जातं. कोणी तो मान चाकाच्या शोधाला देतो. पण दगडावर दगड घासला किंवा लाकडावर लाकूड घासलं की ठिणगी का पडते याचं इंगित त्या वेळी कळलं नव्हतं. तसंच गोलाकार चक्रापायी गती का प्राप्त होते यातील विज्ञानसूत्राचंही आकलन झालेलं नव्हतं. ही परिस्थिती सतराव्या- अठराव्या शतकापर्यंत तशीच राहिली होती. एडवर्ड जेन्नरनं देवी रोगाला प्रतिबंध करणारी लस शोधून काढली त्या वेळीही मानवाच्या अंगी असलेल्या निसर्गदत्त रोगप्रतिकार शक्तीचं ज्ञान झालेलं नव्हतं.

पण त्यानंतर ही स्थिती बदलली आणि ‘प्रस्थापित विज्ञानाचं उपयोजन म्हणजे तंत्रज्ञान’ हे समीकरण रूढ झालं. कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान हा अशाच प्रणालीचा परिपाक आहे. तरीही विज्ञान असो वा तंत्रज्ञान हे नैतिकही नसतं वा अनैतिकही नसतं. ते न-नैतिक असतं. त्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा त्याचा वापर मानवकल्याणासाठी करायचा की मानवविनाशासाठी हे निर्धारित करत असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेलाही हा नियम लागू होतो. विशेषकरून आजच्या यंत्रयुगात जिथं कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वेग भंडावून सोडणारा झाला आहे आणि त्याचा प्रभाव मानवी आयुष्यावर, इच्छा असो वा नसो, अपरिहार्यपणे होत असतो तिथं तर या दुविधेचा विचार करणं क्रमप्राप्त झालं आहे. विज्ञानकथांमधून या विचाराला प्राधान्य दिलं गेलं आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेची गंगोत्री

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून मानवी जीवन अधिक सुरक्षित, अधिक सुसह्य कसं करता येईल याचं चित्रण अनेक विज्ञानकथांमधून झालं आहे. उदाहरणच द्यायचं तर रोगनिदान अधिक अचूक होण्यासाठी तसंच ते वेळ न दवडता होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. ही आजच्या टेलिमेडिसिनच्या प्रवाहात प्रकर्षानं जाणवणारी वस्तुस्थिती आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरातून जन्माला घातल्या गेलेल्या स्टेथॉस्कोपद्वारे हृदयाच्या स्थितीचा अधिक व्यापक आणि अचूक धांडोळा घेणं शक्य झालं आहे. तसंच त्याचे निष्कर्ष दुर्गम ग्रामीण भागातून महानगरांमधील अद्यायावत रुग्णालयांपर्यंत तात्काळ पोहोचवणंही शक्य होत आहे.

या आजच्या वस्तुस्थितीचं चित्रण विज्ञानकथांमधून काही वर्षांपूर्वीच झालं आहे. आजची विज्ञानकथा भविष्यातल्या अशा विधायक वापराचे आयाम सादर करत आहे. त्याचबरोबर काही समाजकंटकांच्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हाती हे तंत्रज्ञान लागलं तर त्याचा वापर दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी केला जाऊ शकतो याची जाणीवही आजची विज्ञानकथा करून देत आहे. हे तंत्रज्ञान सायबर गुन्हेगारीला बळ पुरवू शकेल असा इशारा देण्यातही विज्ञानकथा आघाडीवर आहे. तो जरी प्रतिभाशाली विज्ञान साहित्यिकाचा कल्पनाविष्कार असला तरी तो प्रत्यक्षात उतरण्याचा काळ दूर नाही, याची दखल घेणं हिताचंच ठरणार आहे.

 – डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org