चित्र ओळखण्यापासून सुरू झालेले संगणकीय दृष्टी हे क्षेत्र आता विस्तारत चालले आहे. मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत सध्या या प्रणालीचा वावर सुरू झाला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे कार्य प्रामुख्याने पाठय़पुस्तक व फळा या दोन शैक्षणिक साधनांच्या मदतीने केले जाते. संगणकीय दृष्टी उपलब्ध झाल्यानंतर यात बदल होत आहेत. एलसीडी प्रोजेक्टरचा वर्गात वापर होऊ लागला आहे. दूरस्थ पद्धतीने शिक्षण देणे शक्य झाले आहे.

सुरक्षा समस्यांवर मात करण्यासाठी सोसायटय़ांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये जागोजागी सेक्युरिटी कॅमेरे लावून कुठे काय चालले आहे याची माहिती घेतली जाते. ताडोबा अभयारण्यात वन्यप्राणी आणि माणूस यातील संघर्ष कमी करण्यासाठी संगणकीय दृष्टीचा उपयोग केला जात आहे. अभयारण्याच्या शेजारी असलेल्या गावांत कॅमेरे लावल्यामुळे एखादा हिंस्र प्राणी त्याच्या जवळ आला की लगेच वन खात्याच्या अधिकाऱ्याला सूचना जाते. त्यानंतर ही माहिती एसएमएसद्वारे गावकऱ्यांना दिली जाते. त्यानुसार ते आपल्या गुरा-ढोरांना सुरक्षित स्थळी हलवितात आणि स्वत: सतर्क राहतात.

पूर्वीच्या काळी उद्योग- कारखाने चालविण्यासाठी अनेक लोक कामाला ठेवावे लागत होते. आता मात्र हे काम मोठय़ा प्रमाणावर यंत्रमानवावर सोपविले आहे. विशेषत: धोक्याचे काम करताना यंत्रमानव जास्त उपयोगी पडतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने तीच ती कामे तसेच माणसाला कंटाळवाणी वाटणारी कामे करणे शक्य झाले आहे. भारतात रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संगणकीय दृष्टी प्रणालीचा उपयोग केला जातो. एखाद्या वाहनाने वेगमर्यादा ओलांडली किंवा सिग्नल तोडला तर लगेच दंडात्मक कारवाई करता येते. रस्त्याचा टोल वसूल करण्यासाठी संगणकीय दृष्टीची मदत घेतली जाते. वाहनांना फास्ट टॅग लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जेव्हा वाहन टोल नाक्यावर येते तेव्हा तिथे असलेला कॅमेरा फास्ट टॅगचे वाचन करून संगणकाला माहिती देतो. त्यानुसार जमा रकमेतून योग्य ती रक्कम वजा करून घेतली जाते.

संगणकीय दृष्टी प्रणालीने आरोग्य क्षेत्रातदेखील आपले पाय रोवले आहेत. रुग्णाची तपासणी करणे, त्यावर उपाय सुचविणे, वेळोवेळी औषध देणे अशी अनेक कामे या प्रणालीच्या माध्यमातून केली जातात. शस्त्रक्रिया करणारे रोबोही बनविण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सुधाकर आगरकर ,मराठी विज्ञान परिषद