जगातील जैवविविधतेचा विचार करताना आपल्याला सहजपणे झाडे, प्राणी, पक्षी, कीटक हे घटक आठवतात. पण त्याहीपलीकडे एक अदृश्य, सूक्ष्म आणि अनोख्या विविधतेने भरलेले विश्व अस्तित्वात आहे, ते म्हणजे सूक्ष्मजीवांचं. १ ग्रॅम मातीत १० अब्ज सूक्ष्मजीव असतात, १ घनफूट हवेत २८००० सूक्ष्मजीव असतात आणि १ लिटर पाण्यात १० अब्ज विषाणू आणि १ अब्ज जिवाणू असतात.

माती, पाणी, हवा, खडक, वाळवंट, हिमनग, ज्वालामुखी, महासागरांचा तळ हे सगळे सूक्ष्मजीवांचे अधिवास आहेत. त्यांच्या विविधतेचे मोजमाप करणेही आजघडीला कठीण आहे, कारण दरवर्षी सूक्ष्मजीवांच्या हजारो नवीन प्रजाती सापडत आहेत. एखाद्या प्रजातीतील जनुकीय फरक, एखाद्या विभागातील अशा अनेक प्रजाती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्थानिक आणि वैश्विक परिसंस्था असा हा वैश्विक पसारा आहे. सूक्ष्मजीवांमध्ये बॅक्टेरिया, आर्किया, प्रोटिस्ट, फंगस, विषाणू आणि काही सूक्ष्म शैवाळांचाही समावेश होतो. त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि जैवविविधतेचा पसारा इतका अफाट आहे की त्यांची तुलना पृथ्वीवरील कोणत्याही इतर जीवसमूहाशी करता येणार नाही.

सूक्ष्मजीव परिसंस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये सहभागी असतात. उदाहरणार्थ ‘नत्रचक्र’. सूक्ष्मजीवांचा एक समूह नत्रचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हवेतील नायट्रोजन स्थिर करणारे जिवाणू वेगळे, सेंद्रिय नायट्रोजनचे रूपांतर अमोनियामध्ये करणारे वेगळे, अमोनियाचे नायट्राइटमध्ये करणारे वेगळे आणि नायट्राइटचे नायट्रेटमध्ये करणारे वेगळे. म्हणजे झाडाच्या मुळाशी ही जैवविविधता असेल; तरच हे चक्र पूर्ण होऊ शकते. यातील एक जरी जिवाणू नामशेष झाला तरी हे चक्र थांबते.

अशी शेकडो निसर्गचक्रे हजारो विविध सूक्ष्मजीवांमार्फत अव्याहत चालू असतात. समुद्रातील सूक्ष्म प्लवक (फायटोप्लँक्टन) वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात आणि पृथ्वीचे हवामान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ही कार्ये, अदृश्यपणे, पण अचूकपणे केली जातात. आणि म्हणून वसुंधरेच्या अस्तित्वासाठी सूक्ष्मजीवांची विविधता अनमोल ठरते. अनेक औषधे, लसी, अन्नप्रक्रिया, जैवविघटन, जैवइंधन निर्मिती, शेतीतील जैविक खते, पाण्याचे शुद्धीकरण, सांडपाण्याचे शुद्धीकरण या सगळ्यांमध्ये सूक्ष्मजीव कार्यरत असतात. आजच्या आधुनिक जैवतंत्रज्ञानातही सूक्ष्मजीवांचा वापर संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांनी क्रांती घडवली आहे.

मात्र या जैवविविधतेवर अनेक संकटे घोंघावत आहेत. प्रदूषण, हवामान बदल, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर, मानवनिर्मित अधिवास यामुळे सूक्ष्मजीवांचे नाजूक परिसंस्थात्मक जाळे विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच जैवविविधतेच्या व्यापक चर्चेत सूक्ष्मजीवांच्या संवर्धनाकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. मोनाली संदीपकुमार साळुंखे 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.