मानवी भावना ओळखणारे यंत्रमानव व इतर स्वयंचलित यंत्रे जेव्हा प्रत्यक्षात येतील तेव्हा मानवी आयुष्यात कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडतील याचे अनेक अंदाज वर्तवले जातात. भविष्याचा अचूक आणि सर्वस्पर्शी वेध घेणे शक्य नसले तरी, काही अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. भावना समजणारे यंत्रमानव हे रुग्णांचे व वृद्धांचे उत्तम परिचारक होऊ शकतील. रुग्णाची २४ तास न कंटाळता, शारीरिक व मानसिक गरजा ओळखून सेवा करणे आवश्यक असते. यंत्रमानव हे क्षेत्र निश्चित संभाळू शकतील.

शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता, गरजा आणि आवडी वेगळय़ा असतात. त्या गरजा ओळखून शिकवणाऱ्या वैयक्तिक शिक्षकाची भूमिकाही यंत्रमानव निभावू शकतील. मानसिक रुग्णांना समुपदेशन व सोबत करण्याचे कामही यंत्रमानवाला देता येईल. इतर कुणापाशी अंतर्मनातील भावना व्यक्त करणे मानवाला कठीण असते, पण यंत्रापाशी हे रुग्ण कदाचित अधिक मोकळेपणाने बोलू शकतील.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

शारीरिक कष्टाची अवघड व कंटाळवाणी सर्वच कामे यंत्रे माणसाहून अधिक चांगल्या प्रकारे न थकता करू शकतील. त्यामुळे मानवाला आपल्या कुटुंबीयांबरोबर अधिक वेळ घालवता येईल आणि आपले छंद जोपासण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल. कुठलेही काम यंत्रमानव अधिक प्रामाणिकपणे व सातत्याने दर्जेदार असे करतील. त्याचा सर्वच क्षेत्रांत आपल्याला आर्थिक फायदा होईल.

या सर्व आशादायक चित्रांना छेद देणारे काही महत्त्वाचे प्रश्नही या यंत्र आणि मानवाच्या सहजीवनातून निर्माण होतील. अनेकांच्या नोकऱ्या व व्यवसाय स्वयंचलित यंत्रांमुळे जातील. रोजच्या आयुष्यातील बहुतेक लहान-मोठी कामे यंत्रेच करणार असतील तर, अनेकांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होईल. कष्ट करणे, इतरांना मदत करणे यात फक्त सक्ती वा कंटाळा नसतो तर कष्टाचा आनंद व त्या कृतींतून मिळालेले समाधानदेखील असते. हे समाधान आणि कामातील सर्जनाचा आनंद यंत्रांनी हिरावला तर मानवाचे आयुष्य अर्थशून्य होण्याचाही धोका आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता घातांकीय (एक्सपोनेंशियल) वेगाने प्रगती करते आहे. प्रचंड वेगाने येऊ घातलेले आणि जगातील प्रत्येक माणसाच्या आयुष्याला स्पर्श करू शकणारे हे बदल तितक्याच वेगाने स्वीकारणे मानवासाठी सोपे नसेल. सुबत्ता, सोय आणि आराम यांचे सुंदर स्वप्न जरी ही कृत्रिम बुद्धिमत्ता दाखवत असली, तरी त्यातून निर्माण होणारे गंभीर प्रश्न हाताळण्याचे व कृत्रिम बुद्धिमत्तेची नीतिमत्तेशी अतूट सांगड घालण्याचे मोठे आव्हानसुद्धा मानवापुढे उभे ठाकले आहे.

प्रा. माणिक टेंबे,मराठी विज्ञान परिषद