‘कुतूहल’च्या वाचकांना नमस्कार. ‘कुतूहल’ हे सदर २००६ साली सुरू झाले आणि तुम्हां सर्व वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे ते अखंडपणे गेली १८ वर्षे सुरू आहे. २०२४ सालचे हे १९ वे वर्ष आहे. या सदरातले लेख शालेय विद्यार्थी आणि शिक्षक तर वाचतातच, पण यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे विद्यार्थीही वाचतात. त्यामुळे साहजिकच मराठी विज्ञान परिषदेला या लेखांतील माहिती अद्ययावत आणि अचूक असण्याची खबरदारी घ्यावी लागते. शालेय विद्यार्थी याची कात्रणे काढून ती चिकटबुकात चिकटवून ठेवतात, तर काही ग्रामीण शाळांत सकाळच्या प्रार्थनेनंतर हे सदर जाहीरपणे वाचून दाखवले जाते. आजवर आम्ही वैद्यकीय, अभियांत्रिकी, मोजमापन, खगोल अशा चार विषयांवरची पुस्तके अन्य प्रकाशक अथवा मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रसिद्ध करू शकलो. वनस्पतीशास्त्राच्या सदरात दर शुक्रवारी एकेका भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञाची माहिती दिली होती. त्यात आणखी भर घालून १०० वनस्पतीशास्त्रज्ञांचे पुस्तक तयार झाले. 

 मानवी प्रवासात मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा यासाठीच्या गरजा शेतीतून भागत होत्या अथवा खनिज पदार्थ भागवत होते, पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली तशी ही संसाधने कमी पडू लागली आणि मग शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी कृत्रिम गोष्टी शोधून काढल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावताना आणि वापर करताना मानवी बुद्धी कमी पडली नाही, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मितीच मुळी मानवी बुद्धीतून झाली आहे.  जिथे वेगाने कामे करायची आहेत, किचकट आकडेमोड करायची आहे, जिथे मानवाला धोका आहे, पण काम तर करणे गरजेचे आहे अशा ठिकाणी यंत्रमानवाचा उपयोग करणे, चाणाक्ष बुद्धी वापरून केलेली गुन्हेगारी पकडणे, अशा अनेक गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आता होऊ लागल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आता ‘चॅटजीपीटी’ आदी संगणक-उपयोजनांच्या स्वरूपात हातातील भ्रमणध्वनीवरही पोहोचल्याने क्वचित प्रसंगी आपण त्याच्या आहारी जातो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. हे सगळे आता तुम्ही येते वर्षभर अनेक तज्ज्ञांच्या लेखांतून वाचणार आहात. तुमच्या सूचना व सहभाग हेसुद्धा आम्हाला हवे आहे, त्यासाठी प्रत्येक लेखाखाली दिलेल्या ई-मेलद्वारा आमच्याशी संपर्क साधू शकता.

– अ. पां. देशपांडे,मराठी विज्ञान परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.