मानवाच्या सर्वसाधारण वर्तनाला नैसर्गिक बुद्धिमत्ता समजले जाते. जर हे वर्तन यंत्राने किंवा संगणकाने केले तर त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. यासाठी यंत्राद्वारे विशेषत: संगणकाद्वारे मानवी बुद्धिमत्तेचे अनुरूपण (सिम्युलेशन) करावे लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान हे विदा संचालित (डेटा ड्रिव्हन) असल्याने ते हवामानाच्या अंदाजासाठी तसेच हवामानातील बदलांच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे. कृत्रिम चेतासंस्थेसारखेच जाळे वापरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग हवामानाच्या अंदाजातील क्लिष्ट समस्या सोडविण्यासाठी यशस्वी ठरला आहे.

हवामानाचा अंदाज देणारी प्रसारमाध्यमे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर १९७० च्या दशकापासूनच करत आहेत. हवामानाच्या प्रारूपांमध्ये क्लिष्ट गणनविधी (अल्गोरिदम) असतात आणि त्या महासंगणकांद्वारे सोडवल्या जातात. यामध्ये यंत्राचे स्वअध्ययन (मशीन लर्निंग) या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो.

कृत्रिम बुद्धिमत्तेची गणनविधी ही गतकाळातील तसेच सद्याकालीन विदांचे जलद विश्लेषण करून हवेच्या गुंतागुंतीचे स्वरूप ओळखून हवामानाच्या घटकांचे परस्पर संबंध प्रस्थापित करते, जे पारंपरिक विश्लेषण पद्धतीत दिसून येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हवेच्या घटकांच्या निरीक्षणांच्या विदांचे विविध प्रकार ओळखते त्यामुळे हवामानाच्या अंदाजाची गुणवत्ता वाढून तो अधिक अचूक ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने प्रचंड प्रमाणातील विदांचे विशेषत: सद्या:स्थितीतील विदांचे विश्लेषण करणाऱ्या गणनविधींच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. यामुळे अद्यायावत हवामानाचा अंदाज अतिजलदपणे आणि वेळेवर मिळणे शक्य होते.

हवामानाची अत्याधुनिक प्रारूपे हवेच्या विविध स्वरूपांतील स्थितींचे विश्लेषण करू शकतात. ही प्रारूपे अशा प्रकारे तयार केली जातात की ते विदांचे विश्लेषण करून योग्य ते निर्णय घेऊ शकतात. यामध्ये संगणकाच्या विश्लेषणाच्या गतीला फार महत्त्व आहे. कारण हवेतील बदल हे फार जलद गतीने होत असतात, विशेषत: चक्रीवादळाची वेगाने बदलणारी स्थिती ज्यामध्ये संगणकाला अतिजलदपणे निर्णय घेणे व कृती करणे आवश्यक असते.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या हवामानाच्या अंदाजाचा वेग आणि अचूकता वाढल्याने हवामान शास्त्रज्ञांना हवामानाचा अंदाज सर्वत्र जलदपणे व प्रभावीपणे पोहोचवता येतो. तसेच हवामान बदल व त्यांच्या परिणामांचा खोलवर विचार करून उपाययोजना करता येतात. यासाठी योग्य संगणक प्रणाली व हवामानाची प्रारूपे यांची निवड करणे अत्यावश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-अनघा शिराळकर