वस्तुमान आणि वजन या दोन भौतिक राशींत बऱ्याचदा गल्लत केली जाते. वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्यसंचय, एखाद्या पदार्थामध्ये असणारे द्रव्याचे प्रमाण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे, तर पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने त्या पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल.  वस्तू कितीही सूक्ष्मातिसूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काही तरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते, कारण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते. परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदलत होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिकराशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (रक)  पद्धतीतील एकक किलोग्रॅम किंवा सेंटिमीटर-ग्राम-सेकंद (उॅर) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे. वजनाचे रक पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर उॅर पद्धतीतील एकक डाइन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची एकके उदा. ग्रॅम, किलोग्रॅम वापरली जातात.  वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजताना प्रमाणित वस्तुमानाच्या पदार्थाशी त्याची तुलना केली जाते. सर्वसाधारणपणे, समभुज तराजूच्या एका पारडय़ात ज्या वस्तूचे वस्तुमान मोजायचे आहे, ती वस्तू ठेवतात व दुसऱ्या पारडय़ात प्रमाणित वस्तुमान असलेली मापे टाकतात. जेव्हा तराजूचा काटा मध्यभागी स्थिरावतो तेव्हा प्रमाणित मापे असलेल्या पारडय़ातील मापांची बेरीज करतात व तेच त्या वस्तूचे वा पदार्थाचे वस्तुमान असते. ताणकाटा, इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा अशा प्रकारची साधनेदेखील वस्तुमान मोजण्यासाठी वापरली जातात.

ताणकाटय़ामधील िस्प्रग गुरुत्वीय बलानुसार आणि पदार्थाच्या वस्तुमानानुसार ताणली जाते. जास्त वस्तुमानाच्या पदार्थामुळे िस्प्रग जास्त ताणली जाते. ताणकाटय़ावर प्रमाणित वस्तुमानाची वेगवेगळी वजने टांगून त्याप्रमाणे खुणा केलेल्या असतात.

इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटय़ात दाबाला संवेदनशील असलेला एक संवेदक एका सपाट पृष्ठभागाखाली लावलेला असतो. प्रमाणित वस्तुमानाची मापे ठेवून हे उपकरण प्रमाणित करून घेतात. किती दाब पृष्ठभागावर पडला आहे हे आकडय़ाच्या स्वरूपात वाचन फलकावर बघता येते व त्यानुसार वस्तुमान मोजता येते.

– डॉ. हिरण्मयी क्षेमकल्याणी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य – साहित्य

कवी म्हणून लेखनाला सुरुवात केलेल्या बीरेंद्रकुमार यांना ‘रामधेनू’च्या संपादकीय कार्यामुळे आधुनिक आसामी साहित्याचे जनक मानले जाते.

आतापर्यंत त्यांच्या २० कादंबऱ्या, ६० कथा, १०० कविता, १० नाटके, अनेक निबंध लेखन आणि बंगाली व इंग्रजी साहित्याचे आसामीमध्ये केलेले अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यांचे सर्व साहित्य अजून पुस्तकरूपात प्रकाशित झालेले नाही. रेडिओसाठी त्यांनी अनेक श्रुतिकाही लिहिल्या. एकूण ५० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

गुवाहाटीच्या कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांच्या एका कथेला बक्षीस मिळाले होते. त्यांचा कथासंग्रह ‘कलंग अजियु बोय’ (१९६२)मुळे त्यांचे नाव समर्थ कथालेखक म्हणून वाचकांसमोर आले.

‘जीवनभर विपुल अमृतराशी’ (१९४६) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या काही चांगल्या कविता ‘जयंती’ मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. तर १९५६ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘राजपथे रिंडीयाय’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांच्या कादंबऱ्यांतून तत्कालीन जनजीवनाचे चित्र दिसते. त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा, विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा, प्रसंगचित्रण विलक्षण वास्तववादी, प्रत्ययकारी दिसते. भाषाशैलीही सरळ, ओघवती, क्वचित उपरोधपूर्णही आहे. ‘इयरुइंगम’  (१९६०), ‘आई’ (१९६०), ‘शतघ्नी’ (१९६५), ‘मृत्युंजय’ आणि ‘प्रतिपद’ (१९७०) या त्यांच्या खास उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत.

‘राजपथे रिंडीयाय’ ही कादंबरी स्वातंत्र्य आंदोलनातील एका दिवसाच्या घटनेवर आधारित असून, तत्कालीन जीवनाचे, मानसिक ताणतणावांचे, संघर्षांचे, धक्कादायक अनुभवांचे चित्रण यात आहे.

डिग्बोई रिफायनरीच्या मजुरांचा संप हा ‘प्रतिपद’ या कादंबरीचा विषय असून, लेखक सामाजिक असमानतेच्या विरुद्ध विद्रोहाच्या बाजूने किती आहे, याचे दर्शनच या कादंबरीत घडते. ‘इयरुइंगम’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून, या कादंबरीचा ‘लोकांचे राज्य’ हा मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे. नागासमस्या, इम्फाळमधील सामान्य माणसाच्या उद्ध्वस्त जीवनाची ही कहाणी आहे. यानंतरची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी एक चांगली राजनीतिक कादंबरी आहे. ती १९४२ च्या स्वतंत्रता आंदोलनाशी संबंधित आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mass and weight marathi articles
First published on: 24-04-2017 at 03:41 IST