सध्या महाराष्ट्रासह देशभरात सूर्य आग ओकत आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशाच्या विविध भागांसाठी उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात उष्माघाताने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर काहींचा मृत्यू झाला. उष्णतेची लाट म्हणजे काय? या धोक्याचा सामना करण्यासाठी काय तयारी करण्यात आली असून उष्णता नियंत्रण कृती आराखडा म्हणजे काय, याविषयी…
उष्णतेची लाट म्हणजे काय?
भारतीय हवामान विभागानुसार,उष्णतेच्या लाटेची व्याख्या प्रदेशानुसार बदलते. एखाद्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक, किनारपट्टी भागांत ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ भागांत ३० अंश किंवा त्याहून अधिक असल्यास उष्णतेची लाट आल्याचे घोषित केले जाते. एखाद्या ठिकाणी कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान सलग तीन दिवस ३ डिग्री सेल्सिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट आली असे मानतात. तसेच सलग दोन दिवस एखाद्या ठिकाणी तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्यासही उष्णतेची लाट आली असे मानतात. ४७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असते, तेव्हा तीव्र उष्णतेची लाट असे म्हणतात. साधारणपणे मान्सूनपूर्व काळात, म्हणजेच मार्च ते जून या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येतात.
हेही वाचा – विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
उष्णतेच्या लाटांचा सामना कसा केला जातो?
देशभरात उष्णतेच्या लहरींची तीव्रता आणि वारंवारता वाढल्यास विविध स्तरातील प्रशासनांकडून (राज्य, जिल्हा, शहर) उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला जातो. तीव्र उष्णतेचा प्रतिकूल परिणाम कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. उष्णतेच्या लाटेची तयारी, जनजागृती, रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्याची रणनीती आणि उपाययोजनांच्या रूपरेषा आखून काम केले जाते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि भारतीय हवामान विभाग कृती आराखडा तयार करण्यासाठी २३ राज्यांबरोबर काम करत असल्याची नोंद आहे. कृती आराखड्यावर केंद्रीकृत नियंत्रण नसते. राज्य व शहर पातळीवर आराखडे तयार केले जातात. महाराष्ट्र व ओडिशा या राज्यांमध्ये जिल्हास्तरीय उष्णता नियंत्रण कृती आराखडे तयार केले जातात. गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्याचे तापमान सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने नुकताच जिल्हा प्रशासनाने उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला.
कृती आराखडा कसा तयार होतो?
उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यापूर्वी त्या प्रदेशाच्या उष्णतेसंबंधी सर्व माहितीचे संकलन केले जाते. मागील उष्णतेच्या लाटेच्या घटनांची माहिती, कमाल तापमान, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान यांसह विविध गोष्टींच्या माहितीचा समावेश आराखडा तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर धोक्यांचे मूल्यांकन केले जाते आणि उष्णतेची लाट ज्या प्रदेशात आहे, त्याचा नकाशा तयार केला जातो. हा आराखडा उष्णतेच्या लाटेच्या आधी, दरम्यान किंवा नंतर उष्णतेच्या लाटेचे परिणाम कमी करण्यासाठी शिफारशी सादर करतो. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कामगार विभाग, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांसारख्या विविध विभागांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांची रूपरेषाही आराखड्याद्वारे दर्शविली जाते.
शिफारशी कोणत्या?
उष्णता नियंत्रण कृती आराखड्याद्वारे उष्णतेच्या लाटांबाबत सावध करण्यासाठी अंदाज व पूर्वइशारा प्रणाली वापरली जाते. यासंबंधी माहिती सार्वजनिक व संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाते. उष्णतेच्या लाटेशी संबंधित जोखमींबद्दल माहिती देणाऱ्या मोहिमांद्वारे जनजागृती करणे, उष्णता निवारा, शीत केंद्रे उभारणे, निर्जलीकरण टाळण्यासाठी स्वच्छ पाणी प्रदान करणे यांसारख्या उपाययोजना सुचविल्या जातात. रुग्णालयांमध्ये उष्णतेसंबंधी आजार असलेला विभाग उघडण्याची, रुग्णांवर सुसज्ज उपचार करण्याची आणि प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचारी पुरविण्याची शिफारस केली जाते. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या शहर नियोजन धोरणांचा अवलंब करणे, उष्णता प्रतिरोधक बांधकाम साहित्य वापरणे, घरांतील तापमान कमी करण्यासाठी थंड छप्पर तंत्रज्ञान वापरणे यांसह विविध दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या जातात. सरकारी संस्था, आरोग्य सेवा प्रदाते, सामुदायिक संस्था आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था यांच्यात प्रभावी समन्वय राखण्यासाठी कृती आराखड्याद्वारे प्रयत्न केले जातात.
हेही वाचा – विश्लेषण : तळकोकणात ‘दादा’ कोण? नारायण राणे पहिल्याच लोकसभा निवडणुकीत यशस्वी होतील?
आव्हाने कोणती?
बदलती हवामान परिस्थिती आणि देशातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीच्या विविधतेमुळे उपाययोजना व्यावहारिक बनवण्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. उष्णतेची लाट राज्ये, जिल्हे आणि शहरे यांसाठी भिन्न प्रमाणात निर्धारित करावी लागते. शहरातील पर्यावरण, वृक्ष लागवड, छताचा प्रकार, पाणी व हिरवळ यांचे सान्निध्य या बाबी आर्द्रतेशिवाय तापमानावर प्रभाव पाडतात. त्यामुळे यांसाठी जनजागृती करून पावले उचलावी लागणार आहेत. उष्मा निर्देशांक विकसित करणे आवश्यक आहे. बहुतेक उष्णता नियंत्रण कृती आराखड्यातील माहिती व उपाययोजना विसंगत आहेत. त्यामुळे ठोस आराखडा तयार करण्याची गरज आहे. स्थानिक सरकारांच्या प्राधान्यक्रमांवर आणि उपलब्ध क्षमतेनुसार आराखड्याची अंमलबजावणी होऊ शकते.
sandeep.nalawade@expressindia.com