संगणकशास्त्रात सतत नवनव्या संकल्पना उदयाला येत असतात. त्यातून या व्यवसायात तरूण मंडळींचा भरणा जास्त. त्यामुळे संगणकशास्त्रात अनेक मासलेवाईक एककं दिसत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिकी हे यातलं एक गमतीदार उदाहरण. मिकी म्हटल्यावर डोळ्यासमोर लगेच मिकी माऊस आला ना? अगदी बरोबर! मिकी हे एकक माऊससाठीच आहे. संगणकाचा माऊस आपण फिरवताना त्यातली किती सूक्ष्म हालचाल तो माऊस टिपून संगणकाकडे पाठवू शकतो याचं एकक आहे मिकी. सर्वसाधारणपणे एका मिलिमीटरमध्ये सुमारे १६ मिकी असतात. म्हणजे एका मिलिमीटरच्या सोळाव्या भागाइतकी हालचाल माऊस टिपू शकतो. ज्या माऊसची मिकी जास्त तो माऊस जास्त अचूक.

असंच मजेशीर एकक आहे ‘निबल’. बिट म्हणजे माहिती नोंदण्याचं सर्वात लहान एकक, तर बाइट म्हणजे आठ बिट्स. आता बाइट या इंग्लिश शब्दाचा अर्थ आहे. एकावेळी तोंडात घेतलेला तुकडा किंवा घास. हेच खाण्याचे संदर्भ लावत संगणकशास्त्रातल्या मंडळींनी निवडलं निबल हे एकक. निबल म्हणजे घासापेक्षा लहान असा खाद्यपदार्थाचा तुकडा. आणि संगणकाच्या संदर्भात – निम्मा बाइट, अर्थात चार बिट्स!

डिजिटल पद्धतीने माहिती साठवण्यासाठी आपण सीडी, हार्ड डिस्क, पेन ड्राइव अशी वेगवेगळी माध्यमं वापरतो. त्यांची स्मृतीक्षमता बहुधा मेगाबाइट्स, गिगाबाइट्समध्ये असते. पण अनेकदा असे नुसते मोठेमोठे आकडे सांगून ऐकणाऱ्याला नीटसा अंदाज येत नाही. म्हणून त्यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवाव्या लागतात.

एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिकाच्या सर्व खंडांत मिळून सुमारे ३०० मेगाबाइट्स इतकी माहिती आहे. त्यामुळे सुरूवातीला सीडीची क्षमता त्याच्यात किती एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका राहतील, यावरून सांगायची पद्धत पडली. आता त्याहूनही भरपूर स्मृतीक्षमता सांगायला ‘लायब्ररी ऑफ कॉंग्रेस’ हे नवं एकक वापरता आलं आहे. अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमधली प्रचंड माहिती डिजिटल पद्धतीने साठवायची म्हटली तर १० टेराबाइट्स लागतील. पण गंमत अशी की अलिकडे मिळणाऱ्या पोर्टेबल हार्ड डिस्कची क्षमता एवढय़ातच दोन टेराबाइट्सपर्यंत गेलेली आहे.  तेव्हा लवकरच आणखी एखादं नवं एकक शोधावं लागेल हे नक्की!

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

  office@mavipamumbai.org

 

महाश्वेतादेवींचे कथालेखन

१९६० मध्ये महाश्वेतादेवींचे ‘सप्तपर्णी’ आणि ‘सोना नय रूपा नय’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले. १९८४ मध्ये ‘श्रेष्ठ गल्प’  हा स्वत: लेखिकेनेच निवडलेल्या कथांचा संग्रह प्रकाशित झाला. आजच्या काळाच्या संदर्भात, पौराणिक, लोककथांचा आधार घेऊन त्यांनी अनेक कथा लिहिल्या आहेत. बागदी, डोम, उराँव, गंजू, बोहुला, संथाल (द्रौपदी), दु:साध, पाखमारा (शाम सवेरे की माँ) या सर्व कथांना लोककथांचा आधार आहे. ‘कथालोक’, ‘कथा पंचदशी’, ‘मीठ व इतर कथा’, ‘कुरुक्षेत्रानंतर’ इ. अनुवादित कथासंग्रहामुळे महाश्वेतादेवींच्या कथा मराठी वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘रुदाली’ या दीर्घकथेवरील चित्रपटही गाजला आहे. त्यांच्या या कथा बंगाली, इंग्रजी, हिंदीतही गाजल्या आहेत.

बिहारमधील आदिवासींचे शोषण, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे भोळेपण, प्रामाणिकपणा आणि एकूणच त्यांची दयनीय स्थिती. पण स्वाभिमानी स्वभाव या साऱ्यांचे चित्रण त्यांच्या कथांतून दिसते. हे आदिवासी कधी काही मागत नाहीत. दिलं तर घेतात. पण त्यांचे हे वैशिष्टय़ शहरी माणसांना समजत नाही. त्यामुळे महाश्वेतादेवी म्हणतात- ‘शहरी मानसिकतेतून आदिवासींना समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे फुटपट्टीने महासागराची खोली मोजण्याचा प्रकार आहे.’

किती विविध प्रकारांनी आदिवासींचे, स्त्रियांचे शोषण होत असते. हे जाणून घ्यायचं तर त्यांच्या ‘द्रौपदी’, ‘स्तनदामिनी’ या दीर्घकथा वाचायला हव्यात. ‘कुंती व निषादी’ आणि ‘पंचकन्या’ या महाभारतातील कुंती व उत्तरा या दोन व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथा आहेत. अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी- यांना पंचकन्या म्हणून गौरवलं जातं. पण याउलट महाश्वेतादेवींच्या या ‘पंचकन्या’ – कुरुक्षेत्रावर मारल्या गेलेल्या अनाम पायदळ सैनिकांच्या विधवा आहेत. उपेक्षित, दुर्लक्षित समाजातील स्त्रियांच्या मूक भावनांना त्यांनी ‘पंचकन्या’ या कथेत शब्दरूप दिले आहे. ‘द्रौपदी’ ही  आदिवासी युवतीची कथा आहे.  पोलिसांनी केलेल्या सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या या आदिवासी स्त्रीने  स्वत्वाची लढाई कशा प्रकारे लढलीयाचे चित्रण करणारी ही कथा आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mickey mouse in computer
First published on: 25-08-2017 at 03:21 IST