आपली आरशातील प्रतिमा आपल्यासारखीच असते, पण उलटी. डावा हात उजव्या जागी आणि उजवा हात डाव्या जागी दिसतो. आपण त्याला प्रतिबिंब म्हणतो. हाच नियम काही विशिष्ट रासायनिक पदार्थांनाही लागू होतो आणि या गुणधर्माला कायरॅलिटी म्हणजेच ‘हँडेडनेस’ (हातपणा) असं म्हणतात. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपले हात. दोन्ही हात दिसायला सारखे वाटतात, पण एकमेकांवर ठेवले तर जुळत नाहीत. उजव्या हाताचा हातमोजा डाव्या हाताला बसत नाही. कारण त्यांच्या रचनांमध्ये फरक आहे. हाच फरक काही रेणूंमध्येही आढळतो. काही रेणू डाव्या हातासारखे असतात (एल-फॉर्म), तर काही उजव्या हातासारखे (डी-फॉर्म). हे दोन्ही प्रकार दिसायला सारखे वाटले तरी, त्यांचं जैविक वर्तन पूर्ण वेगळं असतं.
आपल्या पृथ्वीवर सध्या जे सजीव आहेत, त्यांचं शरीर ठरावीक प्रकारच्या रेणूंनी बनलेलं असतं. उत्क्रांतीच्या प्रवासात जीवसृष्टीने साखरेचा प्रकार, अमिनो आम्लांचा प्रकार, डीएनए आणि आरएनएची रचना, सर्व काही एका निश्चित दिशेने विकसित केली आहेत. उदा. सर्व सजीव प्रथिनं तयार करतात ती फक्त डाव्या हातपणाच्या (एल) अमिनो आम्लांपासून. त्याचप्रमाणे, साखरेचे रेणू उजव्या हातपणाचे (डी) असतात. पण आता कल्पना करा, जर असे सजीव असतील जे या नियमाच्या अगदी विरुद्ध असतील! म्हणजे, असे जिवाणू जे उजव्या हातपणाची अमिनो आम्लं वापरतात आणि डाव्या हातपणाची साखर. हाच विचार ‘मिरर बॅक्टेरिया’ या संकल्पनेमागे आहे. याला आपण ‘प्रतिबिंबित जिवाणू’ म्हणू या. प्रतिबिंबित जिवाणू म्हणजे असे काल्पनिक जिवाणू जे आपल्याला माहीत असलेल्या सर्व सजीवांपासून अगदी उलट असतील, अगदी आरशातल्या प्रतिबिंबासारखे! त्यांचा डीएनए, प्रथिने, साखरेची रचना सगळे आपल्या जगातल्या सजीवांपासून उलट. ते आपल्याला दिसायला नेहमीसारखे वाटतील, पण आतून रासायनिक पातळीवर पूर्ण वेगळे असतील. असे जिवाणू तयार करण्यासाठी सध्याचे तंत्रज्ञान अजून तरी पूर्णत: विकसित नसले तरी येत्या काही दशकांमध्ये असे जिवाणू आपण तयार करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. या प्रतिबिंबित जिवाणूंचे संशोधन केवळ वैज्ञानिक कुतूहलापुरते मर्यादित नाही. पूर्णपणे नवीन अशा औषधनिर्मितीसाठी, जीवनास सखोल समजावून घेण्यासाठी त्यांचा खूप उपयोग होईल. पण सद्या जीवसृष्टीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या सृष्टीच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही नैसर्गिक यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्याने, त्यांच्या वाढीला आवर घालणे अशक्य होईल. परभक्षी, प्रतिजैविके, आपली रोगप्रतिकारक शक्ती हे सर्व त्यांच्यावर अप्रभावी ठरू शकतात.
– डॉ. विनायक पांडुरंग सुतार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
