कैरो शहराचे आणि परिसराचे आधुनिकीकरण मेहमत अली या सुलतानाने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास सुरू केले. आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्याने सुरू केलेले नागरी आधुनिकीकरण पुढचा सुलतान इस्माइल पाशा याने अधिक मोठय़ा प्रमाणात केले. नेपोलियन तृतीय याने पॅरिस शहराचे आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण केले. त्याचा आदर्श ठेवून त्याच धर्तीवर पाशाने तत्कालीन कैरोच्या पश्चिमेकडे नवीन वसाहती वसवून अनेक चौक आणि रुंद रस्ते बांधून सुनियोजित इमारती, प्रासाद उभे केले. कैरोच्या या नवीन भागाला इस्लामिक कैरो असे नाव आहे. या भागाला युरोपच्या आधुनिक शहरांचे स्वरूप पाशाने आणले. इ.स. १७९८ मध्ये नेपोलियन प्रथमने इजिप्तवर हल्ला करून कैरोवर ताबा मिळवला. त्याचा कैरोतला राज्यकाल फक्त चारच वर्षांचा झाला. पण त्याने कैरोत येताना आपल्याबरोबर खगोलशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, स्थापत्यतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञ, औषधीतज्ज्ञ आणले होते. त्यांनी कैरो आणि आसपासच्या विस्तीर्ण प्रदेशातील पुरातन वास्तू, पिरॅमिड्स, तेथील संस्कृतीचा अभ्यास करून ‘डिस्क्रिप्शन डी इजिप्ते’ हा २० खंडांमधील मोठा ग्रंथ इ.स. १८०९ ते १८२८ या काळात प्रसिद्ध केला. या लोकांनी इजिप्तशियन लोकांची चित्रलिपी अभ्यासून तसेच त्यांच्या पॅपेरस या कागदनिर्मितीची आणि मृत शरीराच्या ‘ममीफिकेशन’चीही माहिती जगासमोर आणली. नेपोलियनबरोबर आलेला चित्रकार डेनान कैरोमध्ये गेला होता. त्याने गिझ्झा आणि इतर ठिकाणच्या पिरॅमिड्स आणि स्फिंक्स यांची चित्रे मोजमापासहित काढून त्यांची माहिती पुस्तकात प्रसिद्ध केली. तोपर्यंत, अत्यंत गूढ वाटणाऱ्या इजिप्तच्या संस्कृतीची अनेक रहस्ये या फ्रेंच लोकांनी जगाला उलगडून दाखविली. त्यानंतरही पुढच्या शतकभर अनेक फ्रेंच आणि इतर युरोपियन लोक इजिप्तच्या चकीत करणाऱ्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी कैरोत येऊन राहत. अ‍ॅमेलिया एडवर्ड्स ही ब्रिटिश महिला १८७३ साली कैरोत आली. तिने कैरोपासून नाइल नदीतून तिच्या उगमापर्यंत होडीतून प्रवास करून ‘ए थाऊजंड माइल्स अप द नाइल्स’ हे पुस्तक लिहिल्यामुळे दक्षिणेतील लक्झर येथील प्राचीन देवळांची माहिती जगासमोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

हरितगृह

पारंपरिक शेतीस आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर उत्पादनाबरोबरच त्यांच्या गुणवत्तेतसुद्धा शाश्वत वाढ दिसून येते. हरितगृह हा आधुनिक तंत्रज्ञानाचाच एक भाग आहे. या तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायामध्ये येणाऱ्या नसíगक आणि मानवी अडथळ्यांवर यशस्वी मात करून हव्या त्या वनस्पतींचे कोणत्याही ऋतूमध्ये अगदी सहजपणे उत्पादन घेता येऊ शकते. वनस्पतीच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी कार्बनडायऑक्साईड या हरितवायूच्या बंदिस्त जागेमधील व्यवस्थापनास हरितगृह असे म्हणतात. त्याचे आयुष्य पाच ते सात वर्षांपर्यंतच सीमित असते. याच्या उभारणीमध्ये अ‍ॅल्युमिनियम पाइपचा योग्य आकृतिबंध सांगाडा जमिनीवर उभारून त्यावर विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिनचे हवाबंद आच्छादन घट्टपणे चढवले जाते. त्यामुळे वनस्पतींना हवा असलेला सूर्यप्रकाशच आतमध्ये पोहचतो. हरितगृहाची उभारणी सपाट, नापीक जमिनीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. त्यासाठी लांबी, रुंदी आणि उंचीचे निकष पाळावे लागतातच, पण त्याचबरोबर आतील पिकांचे नियोजन करताना कर्बवायू, तापमान, आद्र्रता आणि प्रकाश यांच्या आवश्यक प्रमाणावरही लक्ष देणे गरजेचे असते. हरितगृहांमधील वनस्पतींना पाणी, रासायनिक खते आणि मूलद्रव्ये आवश्यकतेनुसार सूक्ष्मप्रमाणात दिली जातात. येथे कीडनाशकांचा वापर होत नाही आणि मजूरही कमी लागतात, म्हणून ही शेती शाश्वत आणि फायद्याची ठरते. हरितगृहामधील भाजीपाला, फुले, फळे यांचा दर्जा उत्कृ ष्ट असतो तसेच त्यांची साठवण क्षमताही जास्त काळाची असते. ही सर्व उत्पादने प्रदूषणमुक्त असतात.

इस्रायल, हॉलंड आणि चीनमध्ये हरितगृह तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. गेल्या दशकापासून भारतामध्येसुद्धा या तंत्रज्ञानाने चांगलेच बस्तान बसविले आहे. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातून निर्यातक्षम फुलशेती केली जाते. शेतीपिकांच्या रोपवाटिका, औषधी आणि सुगंधी वनस्पती तसेच विदेशी भाज्यांच्या लागवडीसाठी हे आधुनिक तंत्रज्ञान प्रयोगशील तरुणांसाठी एक आव्हान आहे. तसेच सतत पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई आणि वातावरण बदल यावर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. हरितगृह उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे अनुदान मिळते. हरितगृह उभारणी आणि त्याचे व्यवस्थापन यासाठी राहुरी, पुणे, बारामती, तळेगाव आणि मुंबईच्या रुईया महाविद्यालयात विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muhammad ali of egypt
First published on: 07-11-2016 at 02:00 IST