ऋजुता पाटील
‘राष्ट्रीय खनिज विकास मंडळ’ (नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) या संस्थेची स्थापना १५ नोव्हेंबर १९५८ रोजी झाली. संस्थेचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. इथेच संस्थेचे संशोधन आणि विकास केंद्रही आहे. लोह, खनिज, चुनखडी, तांबे व हिरे यांचे अन्वेषण व खनन यात हे मंडळ कार्यरत आहे. खनिज उत्पादन उद्याोगात हे मंडळ सध्या संपूर्ण जगात सहाव्या क्रमांकावर आहे. पोलाद मंत्रालयांतर्गत ‘नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम’ म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली असून हे मंडळ खाणकाम क्षेत्रात भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे. जागतिक स्तरावरील पर्यावरणपूरक खाण उद्याोग आणि सामाजिक विकासावर सकारात्मक भर देणारे दर्जेदार पोलाद उत्पादक म्हणून नाव कमावणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

छत्तीसगड राज्यातली बैलादिला येथील लोहखनिज खाण, कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातली दोनीमलाई लोहखनिज खाण आणि मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातली हिऱ्यांची खाण, या खाणी सध्या या मंडळाचे मुख्य प्रकल्प आहेत. यासोबतच छत्तीसगडमध्ये नागरनार आणि त्याचप्रमाणे बाचेली, छत्तीसगड हे प्रकल्पदेखील सुरू आहेत. २०३० पर्यंत दरवर्षी १०० दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनक्षमता विकसित करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. तसेच आग्नेय आशियातील एकमेव यांत्रिकीकृत हिऱ्यांची खाण ही संस्था चालवते.

सर्व दर्जाची लोहखनिजे जास्तीत जास्त वापरात आणण्यासाठी ‘खनिजगुलिका संयंत्र’ (पेलेट प्लांट) प्रकल्पाचा विकास हे मंडळ करत आहे. या प्रकल्पांतर्गत लोहखनिजांचे गोळे तयार करण्यात येतात. त्यासोबतच पर्यावरणीय शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी खनिजांची वाहतूक पारंपरिक मार्गाने करण्याऐवजी हरित मार्गांचा वापर करून केली जाते. संशोधन आणि विकास क्षेत्रात आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत मंडळातर्फे संशोधन उपकरणांचा विकास करण्यात आला आहे. राष्ट्रीय खनिज विकास मंडळातर्फे सच्छिद्र किंवा कच्चे लोह विभाग (स्पंज आयर्न युनिट) तेलंगण राज्यातल्या भद्रारी जिल्ह्यात पालोंचा इथे कार्यरत आहे.

राष्ट्रीय खनिज विकास मंडळांतर्गत अनेक उपसंस्था कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीर खनिज विकास मंडळ, झारखंड खनिज विकास मंडळ, कर्नाटक विजयनगर पोलाद मर्यादित, या त्या संस्था होत. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये सोने, लिथियम आणि इतर काही खनिजांचे उत्पादन करणारी एक संस्था मंडळासोबत कार्यरत आहे. राष्ट्रीय खनिज विकास मंडळाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात निगमीय प्रशासन आणि शाश्वत विकास पुरस्कार २०२५ (कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड सस्टेनिबिलिटी अवॉर्ड २०२५) तंत्रज्ञान गुणवता पुरस्कार (टेक्नोलॉजी एक्सलन्स अवॉर्ड) या अलीकडच्या काळात मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश होतो.

ऋजुता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org