आवर्तसारणीमध्ये अणुक्रमांक २८ असलेला निकेल (Ni) हा सल्फर आणि लोह यांबरोबरच पृथ्वीच्या गाभ्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. सोनेरी छटा असलेला परंतु हुबेहूब चांदीसारखा दिसणारा धातू अशी याची ओळख! इ.स. पूर्व ३५०० पासून निकेलचे विविध वापर केले गेल्याचे आढळते. निकेल हे जर्मन शब्द कफरनिकेल (kupfernickel) याचे संक्षिप्त रूप आहे. जर्मनीत तांब्याच्या खाणींमध्ये सापडणारे हे मूलद्रव्य! तांबे मिळविताना १७५१ मध्ये निकेलाईन हे निकेलचे खनिजएक्सेल फ्रेडरिक क्रोन्स्टेड ह्य़ांना सापडले. खरं तर खनिजातून तांबे मिळविताना निकेलचा शोध लागला. निकेल गंजत नाही, त्यामुळे लोखंडापेक्षा चांगला आणि चांदीसारखा चकाकणारा धातू म्हणून निकेलच्या वापराला प्राधान्य दिले जात असे. गंजत नसल्यामुळे निकेलचा उपयोग बऱ्याच देशांच्या चलनामध्ये (नाणी तयार करण्यासाठी) मोठय़ा प्रमाणावर केला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून निकेल धातू नाण्यांमध्ये वापरला गेला. एकविसाव्या शतकात मात्र निकेलच्या वाढत्या किमतीमुळे हा वापर कमी झाला आहे.

निकेल स्टेनलेस स्टील, नायक्रोम अशा संमिश्रांमध्ये वापरला जातो. इस्त्री, पाणी गरम करण्याचे उपकरण अशा विजेवर उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये निकेल आणि क्रोमिअमचा संमिश्र असलेल्या नायक्रोमचा वापर केला जातो. निकेल रासायनिक दृष्टीने अतिक्रियाशील असल्याने उत्प्रेरक म्हणून वापरला जातो. निकेलच्या सर्वात जास्त खाणी रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांत आहेत. भारत मात्र निकेल संपूर्णपणे आयात करतो. चुंबक, बॅटरी, रिचार्जेबल बॅटरी जसे, निकेल कॅडमिअम तसेच निकेल धातू हायड्राईड बॅटरीमध्येदेखील निकेल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. काचेमध्ये निकेल मिसळले असता काचेला हिरवा रंग येतो. अल्निको या निकेलच्या संमिश्रापासून कायमस्वरूपी चुंबक तयार केले जातात. अल्निको हे लोखंडाचे संमिश्र आहे ज्यात लोखंडाबरोबर अ‍ॅल्युमिनिअम, निकेल आणि कोबाल्ट यांचा समावेश असतो. काही वेळा तांबे आणि टिटॅनिअमही यात असते.

बुरशीसारख्या परजीवी तसेच काही जिवाणूमध्ये निकेल आढळते. निकेल मानवी शरीरासाठी घातक आहे. त्याचे शरीरातील जास्त प्रमाण हे श्वसनाच्या विकारांना निमंत्रण देऊ शकते. तसेच काही जणांना निकेल धातूच्या अ‍ॅलर्जीमुळे त्वचा विकारही संभवतात. निकेलची बारीक पूड श्वसनामार्फत शरीरात गेली असता कर्करोग होऊ शकतो.

– ललित जगन्नाथ गायकवाड

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org