कर्करोग निवारणासाठी रोगोपचार पद्धतीत अनेक प्रयोग सध्या सुरू आहेत. विषाणू म्हटले तरी फ्लूपासून ते करोनापर्यंतच्या आठवणींनी अंगावर काटा उभा राहतो. परंतु आता याच विषाणूंनी जनुक अभियांत्रिकी पद्धतीने कर्करोग पेशींची शिकार करून त्यांना नष्ट करण्यासाठी विषाणू उपचारपद्धती हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. याला ‘ऑन्कोलायटिक व्हायरस थेरपी’ म्हणतात.
कर्करोग पेशींना मारक विषाणू हे जनुक अभियांत्रिकी पद्धतीने निर्माण केले जातात किंवा आपल्या शरीरात नैसर्गिकरीत्यादेखील वास करतात. हे विषाणू दुहेरी पद्धतीने कृती करतात आणि शरीरभर असलेल्या कर्करोगग्रस्त पेशींना शोधून काढून त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देतात. प्रथम ते कर्करोग पेशींच्या आत घुसून त्या पेशीला फोडतात. त्या पेशी मरतात. त्यातून ट्यूमर प्रतिजने बाहेर पडतात आणि मानवी प्रतिकारक्षमता कार्यान्वित करतात. यातून निर्माण झालेली प्रतिपिंडे शरीरभर पसरलेल्या कर्करोग पेशींना निष्क्रिय करतात. केंब्रिज विद्यापीठातील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणतात की, ‘हा विषाणू फक्त कर्करोग पेशींनाच नष्ट करत नाही तर एखाद्या लशीप्रमाणे दीर्घकालीन प्रतिक्षमता निर्माण करतो.’
१९५० सालापासून ही कर्करोगोपचार पद्धती वापरली गेली आहे. परंतु सध्या जनुक अभियांत्रिकी पद्धतीने त्यात अधिक अचूकता आणि सुरक्षितता निर्माण झाली आहे. २०१५ साली प्रगत मेलानोमा कर्करोगासाठी उत्परिवर्तित हर्पिस सिम्प्लेक्स विषाणूचा वापर अन्न व औषध प्रशासन मान्य कर्करोगोपचार पद्धती म्हणून केला गेला. ‘टी-व्हीईसी’ ड्रग हा कर्करोगोपचार पद्धतीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतर अनेक कर्करोगांसाठी ही पद्धती इम्युनोथेरपी औषधोपचाराबरोबर वापरली जाऊ लागली, जसे की ग्लायोब्लास्टोमा, पँक्रिअॅटिक आणि कोलोरेक्टल कर्करोग इत्यादी. २०२४ साली ब्रिटनमध्ये कोक्सेकी विषाणूत उत्परिवर्तन घडवून आणून ब्लॅडर कर्करोग ट्यूमरचा आकार ६७ टक्के कमी करण्यात यश संपादन झाले आहे. याचे प्रमुख संशोधक जेम्स थॉर्नटॉर्न यांनी या रोगोपचार पद्धतीचा दावा केला आहे.
हे वैयक्तिकृत औषध (पर्सनलाइज्ड मेडिसीन) उपचार पद्धतीसाठी खूप आकर्षक आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. काही जास्तीची जनुके त्या विषाणूवर संयोजित केली तर त्याची कर्करोग पेशी नष्ट करण्याची क्षमता वाढवता येते. या रोगोपचार पद्धतीत सर्वांत मोठे आव्हान म्हणजे शरीरात या विषाणूंना वाचवणे; कारण आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता नैसर्गिक पद्धतीने कर्करोग पेशींचा सामना करत असताना या विषाणूंचादेखील नायनाट करते. तसेच दुसरे आव्हान विषाणूवहनाचे तंत्र विकसित करणे हे आहे.
-डॉ. रेणू सिंह-मोकाशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
