फ्लोरेन्सजवळच्या िव्हची गावी १४५२ साली जन्मलेला लिओनार्दो दा िव्हची हा प्रबोधन काळातील एक विद्वान चित्रकार. त्याच्या ‘मोनालिसा’ या चित्रकृतीमुळे जगप्रसिद्ध झाला. विख्यात चित्रकार म्हणून त्याला जग ओळखतेच, परंतु त्याशिवाय शिल्पकार, नगररचनाकार, लष्करी अभियंता आणि शरीरविज्ञानाचा गाढा अभ्यासक म्हणूनही प्रबोधन-पर्वात त्याचे योगदान आहे. चित्रकलेतील त्याची विशेष गती पाहून लिओनार्दोच्या वडिलांनी त्याला फ्लोरेन्सचे ख्यातनाम चित्रकार आंद्रे वेरोचिओच्या चित्रशाळेत दाखल केले. इ.स. १४९३ च्या सुमारास मिलानच्या डय़ूक लुडविक स्फोर्झाने होतकरू लिओनादरेला राजाश्रय दिला. त्याची चित्रकला आणि संगीतातील ज्ञान पाहून लुडविकने मिलानच्या सांता मारिया चर्चसाठी येशू ख्रिस्ताने त्याच्या १२ शिष्यांसमवेत घेतलेल्या अंतिम भोजनाचे दृश्य चित्रित करण्याचे काम लिओनार्दोवर सोपविले. १४९७ साली प्लास्टरवर तलरंग वापरून लिओनार्दोने काढलेल्या ‘लास्ट सपर’ या चित्रामुळे तो प्रबोधन काळातील आघाडीचा चित्रकार म्हणून गणला गेला. येशू व सर्व शिष्यांच्या संमिश्र भावनांचे सूक्ष्म चित्रण केल्यामुळे ‘लास्ट सपर’ आता ख्रिस्ती जगाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. इ.स. १५०० ते १५०५ या काळात लिओनार्दोने फ्लोरेन्सच्या फ्रान्सेस्को जेकाँद यांची पत्नी मोनालिसा हिच्या काढलेल्या व्यक्तिचित्राने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले. मोनालिसाच्या चेहऱ्यावरील तिचे भाव, गूढ हास्य, डोळ्यांची विशिष्ट ठेवण यामुळे या चित्राची जादू आज ५१० वर्षांनीही कायम आहे. ‘द व्हर्जिन ऑन रॉक्स’, ‘लेडी विथ अर्मीन’ (सोबतचे चित्र), ‘सेंट जॉन’, ‘मॅडोना ऑफ द कान्रेशन’ ही लिओनार्दोची इतर विख्यात चित्रे. बहुआयामी कुतूहल असलेल्या या कलाकाराने शरीरशास्त्राचा अभ्यास करून हाडे आणि स्नायू यांविषयीची अनेक रेखाटने तयार केली. चित्रकलेशिवाय लिओनार्दोने टेराकोटा या माध्यमातही शिल्पकृती तयार केल्या, इमारतींचे नकाशे आणि यंत्रांचे काल्पनिक आराखडेही तयार केले. आयुष्याच्या अखेरीस १५१८ साली लिओनार्दोचा डावा हात अर्धागवायूच्या झटक्याने निकामी झाला. १५१९ मध्ये फ्रान्समध्ये त्याचे निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

अन्य राज्यांची राज्यपुष्पे

भारताचे राष्ट्रीय पुष्प कमळ हे आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांचेही पुष्प आहे. कमळाचा भाईबंद ‘ब्रह्मकमळ’ हे फूल उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांचे राज्यपुष्प आहे. ब्रह्मकमळाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. रोडोडेण्ड्रॉन हा हिमालयात आढळणारा वृक्ष असून त्याचे फूल हे हिमाचल प्रदेश आणि नागालँड या दोन राज्याचे राज्य पुष्प तसेच ते नेपाळ देशाचेही पुष्प आहे. फूल सुंदर व औषधी असते. एरिकेसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव रोडोडेण्ड्रॉन पाँटिकम असे आहे. फुलांचा उपयोग जेली, सरबत आणि चटणीसाठी करतात.

कचनार म्हणजेच कांचन वृक्षाचे फूल बिहारचे राज्यपुष्प आहे. बोहिनिया वेरिगेटा असे शास्त्रीय नाव असलेला जगातला एक अत्यंत देखणा वृक्ष फुलल्यावर बहारदार दिसतो. पांढऱ्या किंवा जांभळ्या फुलांचा बहर अनेक महिने राहतो. पानांचा आकार उंटाच्या पावलांच्या ठशाप्रमाणे असतो. सिजाल्पिन्नेसी उपकुळातील ही वनस्पती असून तिचा भाईबंद म्हणजे गुलमोहोर.

पलाश किंवा आपल्याकडे पळस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षाचे फूल मध्यप्रदेश, पंजाब आणि झारखंड या तीन राज्यांचे राज्यपुष्प आहे. पळसाचे शास्त्रीय नाव ‘ब्युटिया मोनोस्पर्मा’  असे असून त्याचे कुल फॅबेसी आहे. ‘पळसाला पाने तीन’ किंवा ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणून ओळखला जाणारा पळस भारतीय ऊष्ण वनांतील एक आकर्षक सदस्य असून त्याची लाल फुले प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनातील पळस त्यांच्या वासंतिक कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग असे. पलाश वरून ‘प्लासी’ हे नाव शहराला देण्यात आले, असे म्हणतात. उन्हाळ्यात रुक्ष मराठवाडय़ात फक्त पळस बहरलेला दिसतो. सुगंधाने व रंगामुळे डास फुलाकडे आकर्षित होतात. फुलावर घातलेली अंडी, डिंभ किंवा अळी निर्माण करू शकत नाहीत. एवढेच नाहीतर फुलाला चिकटलेला डास कधीच वेगळा होत नाही.. तिथेच त्याचे जीवन चक्र संपते. फुलापासून लाल रंग काढला जातो.तो धागे रंगवण्यासाठी वापरतात. पानापासून बनवलेले द्रोण आणि पत्रावळी जेवणावळीसाठी प्रसिद्ध आहेत.

डॉ. किशोर कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painter leonardo da vinci
First published on: 31-05-2016 at 04:27 IST