नेपोलियनच्या अस्तानंतर बेकार झालेल्या अनेकांनी लाहोरच्या महाराजा रणजीतसिंग यांच्याकडे विविध पदांवर नोकरी केली. महाराजांनी या जवळपास शंभर परकीयांना त्यांची क्षमता पाहून निरनिराळ्या विभागांत नेमले. यामध्ये फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, अमेरिकन आणि थोडय़ा संख्येने ब्रिटिशही होते. यातील काहींना सन्यदलात सेनानी म्हणून, काही सन्यदलात प्रशासक, काहींना तंत्रज्ञ तर काहींना गव्हर्नरसारखे महत्त्वाचे नागरी प्रशासक म्हणून नेमले. या सर्वामध्ये एक सामायिक गुण होता, तो म्हणजे ते अखेपर्यंत महाराजांशी निष्ठावंत राहिले.
‘अबु तबेला’ या नावाने पंजाबमध्ये प्रसिद्ध झालेला पाओलो क्रेसेन्झो मार्टनिो एवीटेबील हा इटालियन तरुण महाराजांच्या प्रशासकीय सेवेत गव्हर्नर या पदापर्यंत पोहोचला होता. १७९१ साली इटालीतील हजरोला येथे एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या पाओलोचे जुजबी शिक्षण झाल्यावर तो नेपोलियनच्या इम्पिरियल आर्मीत नोकरीस लागला. दोन वर्षे नेपोलियनच्या फौजेत काम केल्यावर त्याला अशी कुणकुण लागली की अमेरिकेत नोकरी-व्यवसायाच्या अधिक संधी नव्यानं उपलब्ध झाल्यात. महत्त्वाकांक्षी पाओलोनं फ्रेंच लष्कराचा राजीनामा देऊन तो अमेरिकेत जाण्यासाठी बोटीवर चढला. परंतु फ्रान्सच्या किनाऱ्यावर एका खडकावर आदळून बोट मोडली.
या अपघातातून शिताफीने वाचलेला पाओलो किनाऱ्यावरच्या गावात मुक्कामाला आठवडाभर राहिला. तिथे त्याला फतेह अलीशाह हा इराणच्या शाहचा एक नातेवाईक भेटला. या काळात इराणचा शाहसुद्धा आपले सन्यदल युरोपियन पद्धतीने प्रगत करण्याच्या खटपटीत होता. पाओलोने फतेहच्या ओळखीने इराणमध्ये शाहच्या सन्यात नोकरी मिळवली. शाहकडे त्याने सहा वर्षे नोकरी केली, या काळात शाह त्याच्या कामावर खूश होऊन त्याला कर्नलपदावर बढती देऊन त्याला ‘लायन अँड द सन’ हा पुरस्कार देण्यात आला. त्याच काळात क्लाऊड कोर्ट हा फ्रेंच सेनानी इराणच्या शाहकडे नोकरीस होता. पूर्वेकडचे नेपोलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराजा रणजीतसिंग यांच्याविषयी माहिती समजल्यावर पाओलो आणि क्लाऊड कोर्ट या दोघांनी इराणी शाहच्या नोकरीचा राजीनामा देऊन लाहोरचा रस्ता पकडला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com