आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. याच्या शोधाची कथा विस्मयकारक आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. त्या वेळच्या इतर रसायनशास्त्रज्ञांप्रमाणेच ब्राण्डसुद्धा परिसाच्या शोधात होता. त्या प्रयत्नात त्याने मानवी मूत्रावर प्रयोग केले. त्यातून त्याला पांढरा फॉस्फरस वेगळा करता आला. सुमारे ११०० लिटर मूत्रापासून फक्त ६० ग्रॅम फॉस्फरस मिळाला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी  लॅवोझिएने १७७७ मध्ये सिद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक असलेला फॉस्फरस, डीएनए- आरएनए यांसारखे महत्त्वाचे जैविक रेणू आणि पेशींच्या आवरणाचा एक घटक असतो. प्रौढ माणसाच्या शरीरात जवळजवळ ७०० ग्रॅम इतका फॉस्फरस असतो आणि यापैकी ८५ ते ९० टक्के हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतो. कॅल्शिअमपासून दात अणि हाडे तयार होत असली तरी फॉस्फरसमुळे ती बळकट होतात. याशिवाय मानवी चेतासंस्थेद्वारे होणाऱ्या संदेशांच्या दळणवळणात फॉस्फरस महत्त्वाची भूमिका बजावतो. स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होण्याकरिता फॉस्फरसची गरज असते. हृदयाच्या स्पंदनांची वारंवारिता राखण्याचे कामही फॉस्फरस करतो. सजीवांच्या चयापचयाचा एक महत्त्वाचा घटक फॉस्फरस आहे (त्यामुळेच मानवी मूत्रातून फॉस्फरस वेगळे करण्यात हेनिग ब्राण्डला यश मिळाले).

ब्राण्डच्या शोधानंतर बरोबर शंभर वर्षांनी (१७६९), हाडांतील कॅल्शियम फॉस्फेट या संयुगात फॉस्फरस असतो याचा शोध लागला. लगेचच हाडांच्या भुकटीपासून फॉस्फरस वेगळा करण्याची पद्धत विकसित झाली. साधारण १८५०पर्यंत फॉस्फरस वेगळा काढण्यासाठी हाडांच्या भुकटीचाच प्रामुख्याने वापर होत होता. विजेच्या वापराला सुरुवात झाल्यानंतर रॉक फॉस्फेट या फॉस्फरसच्या खनिजापासून विद्युत भट्टीमध्ये फॉस्फरस बनविण्याची पद्धत विकसित झाली. आजही याच पद्धतीने फॉस्फरस मिळवला जातो.

एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने आगपेटीच्या उद्योगाकरिता वापरल्या जाणाऱ्या फॉस्फरसचा आज शेतीसाठी लागणारी रासायनिक खते बनविण्याकरिता सर्वाधिक उपयोग होतो. फॉस्फरसच्या ज्वलनशीलतेचा उपयोग दारूगोळा बनविण्याकरिताही केला जातो. फॉस्फरसच्या अधिक वापरामुळे, या मूलद्रव्याचा स्रोत असणारे रॉक फॉस्फेट साधारण ३० वर्षे पुरेल एवढेच उपलब्ध आहे.

किती विचित्र योगागोग पाहा, ज्या हॅम्बुर्ग शहरात फॉस्फरसचा शोध लागला तेच हॅम्बुर्ग शहर जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॉस्फरसपासून वापरून बनविलेल्या दारूगोळ्याचा वापर केला होता.

योगेश सोमण, मुंबई 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phosphorus chemical element
First published on: 20-03-2018 at 02:12 IST