अ‍ॅस्पिरिन हे सुपरिचित औषध वेदनाशामक म्हणून, तसेच ताप उतरवण्यासही उपयुक्त ठरते. अ‍ॅस्पिरिनच्या या औषधी गुणधर्माच्या शोधकथेचा उगम ‘सॅलिक्स’ (विलो) या वृक्षापासून सुरू होतो. या झाडाची साल अथवा पाने चघळली असता ताप उतरतो, याचे ज्ञान सुमेरिअन आणि इजिप्शियन लोकांना इ.स.पूर्व दीड हजार वर्षांपूर्वीही होते. इ.स.पूर्व चौथ्या शतकात हिप्पोक्रेटस हा ग्रीक वैद्य रुग्णांना, वेदना शमविण्यासाठी सॅलिक्सची साल आणि पाने पाण्यात उकळवून त्याचा काढा घेण्यास सांगत असे.

या औषधाच्या पाठपुराव्याचा पहिला संदर्भ हा १७६३ सालचा आहे. इंग्लंडमधील एडवर्ड स्टोन याने या सॅलिक्स वृक्षाची साल, तीन महिने बेकरीच्या भट्टीच्या बाजूला ठेवून वाळवली. त्यानंतर ती कुटून तिची भुकटी केली व ताप येऊन हुडहुडी भरलेल्या सुमारे ५० रुग्णांना दिली. त्यातील बहुतेक रुग्ण हे पूर्ण बरे झाले. सॅलिक्सच्या सालीची ही औषधी उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर, १८२८ साली जर्मन वैद्यकतज्ज्ञ योहान बुक्नर याने या वृक्षाच्या सालींवर प्रक्रिया करून त्यापासून औषधी गुणधर्म असलेले, रंगहीन आणि कडू चवीचे स्फटिक वेगळे केले. सॅलिक्स वृक्षापासून काढलेले सेंद्रिय संयुग म्हणून त्याचे नाव ‘सॅलिसिन’ असे ठेवले गेले. संधिवाताने येणाऱ्या तापावर हे औषध गुणकारी होते. परंतु या औषधामुळे होणाऱ्या पचनसंस्थेच्या विकारांमुळे ते फारसे उपयोगात येऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात राफाइल पिरिया या इटालियन संशोधकाने या सॅलिसिनपासून अधिक तीव्र औषधी गुणधर्म असणारे आम्ल तयार केले व त्याला त्याने सॅलिसिलिक आम्ल हे नाव दिले.

पुढील संशोधनाच्या टप्प्यामध्ये, सॅलिक्स वृक्षास बाजूला करून हे आम्ल प्रयोगशाळेत तयार करणे शक्य झाले. याच सॅलिसिलिक आम्लाच्या रेणूत अ‍ॅसेटिल गटाची पेरणी करून फ्रेंच रसायनतज्ज्ञ चार्लस गेरहार्ड याने १८५२ साली अ‍ॅसेटिलसॅलिसिलिक आम्ल तयार केले. पचनसंस्थेवर कमी दुष्परिणाम घडवणाऱ्या या रसायनाच्या निर्मितीची, बायर या जर्मन कंपनीतील आर्थर आयशेग्य््रान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १८९७ साली एक सुलभ रासायनिक प्रक्रिया शोधून काढली. त्यानंतर हे रसायन बायर कंपनीने अ‍ॅस्पिरिन या नावाने बाजारात आणले. यामुळे सॅलिक्स वृक्षापासून सुरू झालेला हा प्रवास, गुणकारी ठरलेल्या एका महत्त्वाच्या औषधाशी येऊन पोहोचला.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org