सॅटिन वीण ही साधी वीण तसेच ट्विल वीण या दोन्हीपेक्षा वेगळी वीण आहे. ट्विल विणीसारखी तिरकी रेषा या विणीत दिसत नाही. ह्य़ा विणीची कमीत कमी पाच ताण्याच्या आणि पाच बाण्याच्या धाग्यानंतर पुनरावृत्ती होते. या कापडात ताण्या-बाण्याचे छेदन िबदू साध्या तसेच ट्विल विणीपेक्षाही कमी असतात. त्यामुळे हे कापड जास्त मुलायम व चमकदार दिसते. सॅटिनच्या कापडातही दोन प्रकार आहेत. एक ताणादर्शी सॅटिन तर दुसरा बाणादर्शी सॅटिन. ताणादर्शी कापडातील ताण्याची घनता बाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे ताण्याच्या सुताची चमक कापडावर दिसून येते. उलट बाणादर्शी सॅटिन कापडामध्ये बाण्याची घनता ताण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यामुळे इथे बाण्याचे सूत कापडावर वर्चस्व गाजवते. अशा कापडांना अनुक्रमे ताणा सॅटिन आणि बाणा सॅटिन या नावाने ओळखतात. या कापडातही नियमित सॅटिन आणि अनियमित सॅटिन असे उपप्रकारही आहेत. कापडात प्रामुख्याने रंगीत उभे व आडवे पट्टे दाखवण्यासाठी किंवा अन्य सूत उठावदार दिसण्याच्या उद्देशाने या विणीचा वापर केला जातो. जकार्ड वापरून तयार केल्या जाणाऱ्या नक्षीत आकृती भरीव दिसण्यासाठी सॅटिन विणीचा वापर प्राधान्याने करतात. सॅटिन कापडातील सूत कमी पिळाचे असते. याखेरीज ताणा आणि बाणा एकमेकांमध्ये प्रत्येक धाग्यानंतर न गुंतवता तीन किंवा चार धाग्यानंतर एकमेकांत गुंतवले जातात. त्यामुळे कापड मऊ व भरीव असते. बाणास्पर्शी सॅटिन किंवा दमास्क हे कापड मध्ययुगीन काळापासून चीन, भारत, युरोपमध्ये वापरात होते. रेशमी सूत वापरून उत्पादन केलेल्या सॅटिनच्या कापडाला राजदरबारात स्थान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅटिन विणीमध्ये वापरले जाणारे सूत कमी पिळाचे असल्यामुळे, तसेच ताण्या बाण्याचे छेदनिबदू कमी असल्यामुळे ताण्याचे किंवा बाण्याचे जास्त धागे कापडात सामावले जाऊ शकतात आणि त्यामुळे हे कापड भरीव वाटते. या कापडाचेही दोन प्रकार आहेत. पण ते कापड कुठे वापरले जाते त्यानुसार आहेत. पहिला प्रकार हा घरात वापरायच्या कापडांचा, जसे टेबलक्लॉथ, गाद्यावरील चादरी इत्यादी. याची जाडी तुलनेने कमी असते. तर दुसरा प्रकार पडदे, सोफा कव्हर इत्यादीकरिता वापरले जाते. ते तुलनेने बऱ्यापकी जाड असते. त्यासाठी जकार्ड यंत्रणा वापरली जाते. तसेच हे कापड विणताना बहुतांशवेळा रेशमी धाग्यांचा वापर करतात.

सतीश भुटडा (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर

कोटा राज्यस्थापना

राजस्थानातील चंबळ नदीच्या काठी वसलेले, राजधानी जयपूरच्या दक्षिणेस २४० कि.मी. वरील कोटा हे शहर ब्रिटिशराजच्या काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. बाराव्या शतकात राजपुतांच्या हाडा चौहान घराण्याचा राव देवा याने बुंदी आणि हादोती ही गावे वसवून आपले छोटे राज्य स्थापन केले. १२६४ मध्ये त्याने शेजारच्या भिल्लांच्या प्रदेशावर आक्रमण करून त्यांच्या कोतेय या नेत्याला नेस्तनाबूत केले. कोतेयच्या नावाने कोटा असे नामकरण करून बुंदी शासकांनी कोटा गाव आणि आसपासचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला बुंदीचे राज्य अफगाणांच्या अंमलाखाली होते, पण पुढे ते मोगलांच्या वर्चस्वाखाली येऊन त्यांचे मांडलिक बनले. पुढे औरंगजेबाने मोगल सल्तनतची गादी मिळावी म्हणून त्याचे वडील बादशाह शाहजहानशी युद्ध केले. बुंदी येथे झालेल्या या युद्धात बुंदीचा राजा रतनसिंह आणि त्याची पाच मुले शाहजहानच्या बाजूने लढली.
याच युद्धात रतनसिंहची चार मुले मारली गेली, परंतु पाचवा माधोसिंह याने मात्र मर्दुमकी गाजवून शाहजहानला विजय मिळवून दिला. शाहजहानने खूश होऊन माधोसिंहाला कोटाचे राजेपद देऊन स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.
माधोसिंहाच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनीही अनेक वेळा मोगलांना युद्धात मदत करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. झालीमसिंह या मुत्सद्दी राजाने १८१७ साली कंपनी सरकार बरोबर संरक्षणाचा करार करून त्यांची तनाती फौज राखली. कोटा संस्थानचे एकूण क्षेत्रफळ १४,८०० चौ.कि.मी. होते आणि ब्रिटिशांनी राज्याला १७ तोफसलामींचा मान दिला होता.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satin cloth
First published on: 07-08-2015 at 12:50 IST