सर्वात अधिक मूल्यवर्धन करणारी प्रक्रिया म्हणजे कापडाची सौंदर्यमूल्ये वाढवणारी रासायनिक अभिक्रिया. यात वेगवेगळी रासायनिक मूलद्रव्ये आणि संलग्न यंत्रे यांचा वापर करून कापड कांतिमान, आकाराने स्थिर, चमकदार आणि मऊसूत बनविले जाते. अशाच दुसऱ्या एका प्रकारामध्ये मूळ कच्च्या कापडावरही रंग देण्याची प्रक्रिया होते. रंग दिल्यानंतर, नको असलेले फसवे रंग निघून जाण्यासाठी कापड अत्यंत प्रभावीपणे धुतले जाते. धुतल्यानंतर कापडावर सौंदर्यवर्धक प्रक्रिया अनेक प्रकारे केली जाते. कापडात मऊसूतपणा येण्यासाठी त्यावर मृदुकारक मूलद्रव्यांची प्रक्रिया केली जाते. तसेच दुसरी आहे रेझीन प्रक्रिया. कापडाची घडी टिकवून ठेवण्यासाठी रेझीनसारख्या क्रॉस िलकिंग पॉलिमरची प्रक्रिया कापडावर केली जाते. यामुळेच इस्त्री करण्यास सोपे, सुरकुत्यारहित (िरकलफ्री), सहज देखभाल आणि सहज वापर असे गुणधर्म कापडात येतात.
आपण कपडय़ांच्या अनेक जाहिराती पाहतो ज्यात कापडाच्या याच गुणधर्माचा उल्लेख केलेला असतो. खरे तर याचे रहस्य रेझीन प्रक्रियाच आहे. या दोन्ही प्रक्रिया कायमस्वरूपाच्या असतात. अजून एक दुसरी तात्कालिक प्रक्रिया जी यांत्रिक स्वरूपाची असते. यात कॅलेन्डिरग करून कापडाची चकाकी वाढविली जाते. यानंतर सॅनफोरायिझग ही प्रक्रिया केली जाते. कपडे शिवल्यानंतर आकसू नयेत म्हणून ओले कापड या प्रक्रियेत आधीच आकसून घेतले जाते.
प्रत्येक प्रक्रिया ही गुणवत्ता नियंत्रण या विभागाकडून प्रक्रिया नियंत्रण, परीक्षण आणि तपासणीद्वारे नियंत्रित केली जाते. यात प्रामुख्याने कापडाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ग्राहकाच्या मागणीशी तुलना करून तपासले जातात. यात कापडाचा रंग, तन्यता, (टीयर स्ट्रेंग्थ), ग्रॅम्स प्रति चौरस मीटर, तसेच घासणे, धुणे, घाम येणे आणि पाणी या क्रियांमुळे कापडाचा रंग उडून जाण्याशी निगडित गुणधर्म, आकाराची स्थिरता, कापडाची संरचना इत्यादी अनेकविध गुणधर्माचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ, आकाराच्या स्थिरतेमध्ये साधारणत: तीन टक्के आकसणे जगन्मान्य प्रमाण आहे.
– सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – उदयसिंहाचे उदयपूर
चितोड येथील अखेरचा आणि उदयपूर येथील सिसोदियांचा पहिला महाराणा उदयसिंह द्वितीय हा महाराणा संग्रामसिंह ऊर्फ राणासंगचा पुत्र चितोड येथे जन्मला. वडिलांच्या मृत्यूनंतर चितोडच्या गादीवर आलेला त्याचा भाऊ रतनसिंह एका खुनी हल्ल्यात मारला गेला. दुसरा भाऊ विक्रमादित्य याला त्याचा चुलता रणबीर याने ठार मारले. चितोडची गादी बळकाविण्यासाठी रणबीर आता गादीचा उरलेला कायदेशीर वारस उदयसिंह याला मारण्याचा बेत करू लागला. याचा सुगावा उदयसिंहाचा सांभाळ करणाऱ्या पन्ना या दासीला लागल्यावर त्या निष्ठावंत दासीने उदयसिंहाच्या बिछान्यावर आपल्या मुलाला झोपवून उदयसिंहाला मारेकऱ्यांपासून वाचविण्यासाठी शिताफीने कुंभालगढ येथे नेले. इकडे चितोडमध्ये रणबीरच्या मारेकऱ्यांनी उदयसिंहाच्या ऐवजी पन्ना दाईच्या मुलाचा बळी घेतला.
पन्ना दाईने केवळ आपल्या मुलाचे बलिदान देऊन न थांबता उदयसिंहाच्या राहण्याची व्यवस्था कुंभालगडास करून ती स्वत: बुंदी येथे राहू लागली. उदयसिंहाचा ठावठिकाणा मारेकऱ्यांना कळू नये म्हणून ती स्वत: उदयसिंहाला परत भेटलीही नाही. पुढे १५४० मध्ये उदयसिंहच्या चुलत्याचा मृत्यू झाल्यावर सरदार आणि उमरावांनी उदयसिंह द्वितीयला मेवाडच्या राजेपदावर बसविले.
१५६७ साली अकबराने चितोडवर आक्रमण करून वेढा घातला असताना उदयसिंह आपल्या कुटुंबीयांसमवेत चितोडहून निसटून पिछोली या आपल्या गावी आला. पिछोली येथे त्याने नवीन राज्य स्थापून त्या गावाचे नाव उदयपूर असे केले. उदयपूर ही राजधानी ठेवून उदयसिंहाने इ.स. १५६८ ते १५७२ असे राज्य केले. महाराणा उदयसिंहाचे बावीस पत्नी आणि एकूण पंचवीस अपत्ये असे विशाल कुटुंब होते!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com