कैरी पिकून आंबे मिळावेत यासाठी आपण खास पेंढय़ाची आढी घालतो. द्राक्षे, संत्रे यासारखी फळं आपण फ्रीजमध्ये ठेवतो. काही फळं मुद्दाम पिशवीत ठेवतो, तर केळ्यासारखी फळं बाहेर ठेवतो. सरसकट सगळ्या फळांना आपण एकाच पद्धतीने का ठेवत नाही? थोडक्यात आणलेलं फळं जास्त दिवस चांगल्या स्थितीत राहावं यासाठी आपण ते फळ कोणत्या प्रकारचं आहे, हे विचारात घेतो.
काही फळं कच्ची असतानाच इथिलिनमुळं उद्दिपित झालेली असतात. अशी फळं पिकायला थोडा अवधी असताना आधीच झाडावरून काढली तरी त्यांच्यात पिकण्याची क्रिया तशीच पुढे चालू राहते.
उदाहरणार्थ, आंबा, सफरचंद, पेरू, केळी, चिकू, बोरं ही फळं झाडवरून काढल्यानंतरही पिकतात. अशी फळं विकत घेतानाच आपण काळजी घ्यायला हवी.
चीर गेली आहे किंवा कापली गेली आहेत, अशी फळं घेऊ नयेत. अशा फळांतून इथिलिन जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं आणि त्यामुळे फळं पिकण्याची प्रक्रिया वेगात होते.
आढीत एक जरी नासका आंबा असेल तर त्यामुळे बाकीचे आंबे नासतात, हे आपल्याला माहीत आहेच. किडीमुळे वा अन्य कारणांमुळे आंब्यावर व्रण पडतो. इथिलिन बाहेर पडल्यामुळे बाकीचे आंबेही वेळेआधी जास्त पिकतात, नासतात.
पिकलेल्या फळांतून जास्त इथिलिन बाहेर टाकलं जातं. याच गोष्टीचा उपयोग कच्ची फळं पिकवण्यासाठी होऊ शकतो. कच्च्या फळांत एक पिकलेलं फळ ठेवलं तर ती फळे लवकर पिकतील. बराच काळ पिशवीत ठेवल्यानेही फळं लवकर पिकतात.
ते टाळण्यासाठी फळं शक्यतो जाळीदार वा भोके असलेल्या पिशवीत ठेवावीत. पण सर्वच कच्ची फळं इथिलिनमुळं उद्दिपित होऊन पिकतात असं नाही.
संत्रे, मोसंब, लिची, द्राक्षे यासारखी फळं झाडावरून तयारच काढावी लागतात. अशी फळं फ्रीजमध्ये जास्त काळ चांगली राहू शकतात.
थोडक्यात फळ कोणत्या प्रकारचं आहे, यावरून ते कुठं आणि कसं ठेवायचं हे ठरवावं. चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – रक्तपुष्प जास्वंद
कुंपणापाशी लावलेल्या त्या ठेंगण्याठुसक्या झाडावर पताकेसारखी अनेक फुलं ताठ उभी होती. किंचित झुळूक आली आणि त्यांचे देठ थरारले. पाकळ्या सूक्ष्मपणे हलल्या. मधल्या दांडय़ावरचा लाल मखमली तुराही कंपायमान झाला. फुलावरल्या रंगीत फुलपाखरांचे पाय त्यावर टिकले नाहीत. क्षणभर उडून, पंख विलग करून ती पाखरं स्थिरावली आणि फूल स्थिर झाल्यावर त्या तुऱ्यावर विसावली. त्यांच्या पायांना सूक्ष्म परागकण लागले आणि निसर्गाने रचलेल्या विलक्षण शृंगाराचा एक अध्याय पूर्ण झाला.
सभोवतल्या खुरटय़ा गवतांवर मुक्तपणे बागडणाऱ्या इतर पाखरांनी सूर्यकिरणांबरोबर जोडी जमवली. निसर्गाच्या उगम, विकास आणि लय या चिरंतन चक्राचा विजय साजरा केला. झाडावरच्या रक्तवर्णी जास्वंदीच्या फुलांनी हा सोहळा पाहिला.मित्रा, जास्वंदाचं फुलाचे म्हणजे
किती अतिपरिचयात् अवज्ञा करणार आहोत आपण.
तसं म्हटलं तर गुलाबी, पिवळा, जांभळा, शुभ्रपांढरा रंग जास्वंदीच्या फुलांना लाभलाय. केंद्रभागी लालसर आणि पाकळ्या फिक्या पिवळ्या किंवा पांढऱ्या अशा रंगात ही फुलं दिमाखानं शोभिवंत दिसतात. कातऱ्या पाकळ्यांची घंटेसारखी उलटी टांगलेली कात्री जास्वंद तर कोकणात रानोमाळ दिसते, पण रक्तवर्णी जास्वंदाचं सौंदर्य अजोड आहे. उत्स्फूर्तपणे उसळलेला लाल रंग मनाला भावतो.
या फुलात तसं गुलाबासारखं रहस्य नाही की कमळासारखा मंद तेजस्वीपणा नाही. पाच-सहा पाकळ्या, त्याही पूर्णपणे उघडलेल्या आणि मधे पुं व स्त्रीकेसर मिरविणारा दांडा.. संपलं फूल. हे आहे हे असं आहे, सगळं सगळं तुम्हाला अर्पण करून आम्ही फुललोय असा मनस्वी आविर्भाव.
अथर्वशीर्षांत ‘एकदन्त चतुर्हस्तं पाशमंकुश धारिणं’ अशा गणरायाचं वर्णन ‘रक्तवाससम्, रक्तपुष्पै: सुपूजितम्’ असंदेखील केलेलं आहे. ते रक्तपुष्प म्हणजे जास्वंद. हा रक्तवर्ण प्रत्यक्ष लालभडक, तेजस्वी, ऊर्जावाहक लहूचा. त्या रक्तात वीररस आहे, त्याला तमोगुणांच्या भडकपणाची छटा आहे, म्हणूनच कालीमातेलाही जास्वंद पसंत आहे.
उष्णकटिबंधाच्या गरमपणाच्या जास्वंदी फुलात खुणा आहेत म्हणून अनेक देशांनी त्या फुलाला राष्ट्रीयत्व बहाल केलंय. फुलामध्ये रम्य स्वच्छंदीपणा आहे. म्हणून अनेक आदिवासी जनजातींना ते अंगाखांद्यावर खेळवावंसं वाटतं. ते मुळी फ्लॉवरपॉटातल्या कृत्रिम नेपथ्यात शोभत नाही. कानामागे जास्वंदीचं लालभडक फूल लावून नाचणारी आदिवासी युवती आपल्या रसरशीत कौमार्याचा सूचक संकेत करते, तर निसर्गाच्या रंग- आकारात देवत्व शोधणारे चित्रकार पाकळ्यांची आकर्षक रचना करून गणरायाच्या रूपाची मांडणी करतात. बाकी काही उपयुक्ततावादी त्या फुलांना चुरडून, वाळवून, कुस्करून त्यातून चीक, रंग आणि तेल काढतात. काढोत आपले. आपल्याला मात्र झाडावर तोऱ्यात उभं राहणारं जास्वंदीचं फूलच अधिक आवडतं!
मित्रा, तुला काय वाटतं रे..
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – आगरकरांचा ‘सुधारक’
आगरकरांनी आपल्या विचारांसाठी ‘केसरी’तून बाहेर पडून ‘सुधारक’ हे साप्ताहिक काढले; तेव्हा त्यामागच्या हेतूविषयी त्यांनी लिहिले –
‘‘कोणत्याही वादग्रस्त प्रश्नांविषयीं जें लोकमत असेल, तें पुढें आणणें हेच काय तें पत्रकर्त्यांचें कर्तव्य असें जें मानीत असतील, ते तसें खुशाल मानोत. लोकमत अमुक टप्प्यापर्यंत येऊन पोंचलें आहे, सबब कोणत्याही व्यक्तीनें किंवा सरकारनें त्यापुढें जाऊ नये, असें म्हणणें म्हणजे झाली तेवढी सुधारणा बस्स आहे, पुढें जाण्याची गरज नाहीं, असेंच म्हणण्यासारखें होय. व्यक्तीने किंवा सरकारने साधारणपणें लोकमत धरून वर्तन करणें किंवा कायदे करणें हे सामान्य गोष्टींत ठीक आहे; पण काहीं प्रसंगीं लोकांच्या गाढ अज्ञानामुळें किंवा दुराग्रहामुळें, व्यक्तीस लोकांची पर्वा न करितां स्वतंत्रपणे वर्तावें लागतें व सरकारास लोकमतांविरुद्ध कायदे करावे लागतात. बारकाईचा विचार केला तर असें दिसून येईल कीं, प्रजासत्ताक राज्यांतसुद्धां अनेकदां बहुमतांविरुद्ध अधिकृत लोकांचें म्हणजे सरकारचें वर्तन होत असते. तथापि सामान्यत: सरकारचे वर्तन लोकमतास धरून असेल तितकें बरें. पण जे लोक हा सिद्धांत कबूल करतात ते, लोकमत दिवसेंदिवस सुधारत चाललें आहे, असें समजतात. तेव्हा आतां असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, लोकमताची सुधारणा व्हावी तरी कधी? जो तो अस्तित्वांत असलेल्या लोकमतापुढें जाण्यास भिईल तर त्यांत बदल व्हावा कसा? लोकाग्रणींनी हें काम पत्करलें नाहीं तर ते कोणी पत्करावयाचें? जो तो या लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल तर कोणत्याही समाजाला उन्नतावस्था येणार नाहीं; इतकेंच नाहीं, तर त्याची चालू स्थितीसुद्धां कायम न रहातां उलट त्यांस उतरती कळा लागून अखेर त्याचा ऱ्हास होईल. म्हणून कोणीतरी अस्तित्वांत असलेल्या लोकमतांतील दोषस्थळें दाखविण्याचें, व समाजांतील बहुतेक लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढें आणण्याचें, अनाभिमत काम करण्यास तयार झालेंच पाहिजे.’’