कृत्रिम धागा बनवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न इंग्लंडच्या जोसेफ स्वार्न याने १८८३ साली केला. यासाठी त्याने वनस्पतींत आढळणाऱ्या सेल्यूलोज या पिष्टमय पदार्थाचा वापर केला. हा बहुवारिक (पॉलिमर) पदार्थ सहजपणे कोणत्याच द्रावकात विरघळत नाही. नायट्रिक आम्लाची प्रक्रिया केल्यावर मात्र त्याचे रूपांतर, इथर वा अल्कोहोलसारख्या सेंद्रिय द्रावकांत सहजपणे विरघळणाऱ्या नायट्रोसेल्यूलोजमध्ये होते. या द्रावणात सुई बुडवून बाहेर काढली, तर सुईबरोबर बाहेर आलेल्या मिश्रणातील द्रावणाचे हवेत बाष्पीभवन होऊन धाग्याच्या स्वरूपातील नायट्रोसेल्यूलोज मागे राहते. जोसेफ स्वार्न याने जाळीतील बारीक छिद्रांतून हे नायट्रोसेल्यूलोज पाठवून त्यातून असे धागे निर्माण करण्याचे तंत्र विकसित केले. नायट्रोसेल्यूलोज हे ज्वालाग्राही असल्याने, स्वार्न याने या नायट्रोसेल्यूलोजचे रूपांतर पुन्हा सेल्यूलोजमध्ये करण्याची रासायनिक प्रक्रियाही विकसित केली. जोसेफ स्वार्न याने मुळात जरी हा ‘धागा’ इलेक्ट्रिक बल्बसाठी तंतू म्हणून बनवला असला, तरी कापड उद्योगातील त्याचे महत्त्व अल्पकाळातच स्पष्ट झाले. जोसेफ स्वार्नचा हा धागा नैसर्गिक सेल्यूलोजपासून बनवलेला असल्याने तो पूर्णपणे कृत्रिम नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९३० च्या सुमारास डू पॉण्ट या अमेरिकी कंपनीतील वॉलेस कॅरोथर्स हा संशोधक बहुवारिकांवर संशोधन करत होता. छोटय़ा रेणूंपासून बहुवारिकांच्या लांबलचक रेणूंची निर्मिती शक्य असल्याचे त्याने जाणले. अशा रेणूंची निर्मिती करताना त्यातून पाण्याच्या रेणूसारखे छोटे रेणू निर्माण होतात. या ‘संघनन’ (कंडेन्सेशन) पद्धतीद्वारे त्याने, ‘निओप्रिन’ या नावे नंतर विकल्या गेलेल्या कृत्रिम रबराची निर्मिती केली. कॅरोथर्सला आता याहून अधिक लांबलचक, ज्याला धाग्याचे गुणधर्म असतील असे बहुवारिक निर्माण करायचे होते. यासाठी पॉलिअमाइड गटांतील बहुवारिके सोयीची असल्याने, कॅरोथर्सने यासाठी ८० हून अधिक पॉलिअमाइड बहुवारिकांची निर्मिती केली. अखेर अमाइन, हेक्सामेथिलिन डायअमाइन आणि अ‍ॅडिपिक आम्ल यापासून, धागा काढता येईल असे बहुवारिक निर्माण झाले. परंतु या बहुवारिकापासून निर्माण झालेला धागा फारच नाजूक होता. अधिक संशोधनानंतर कॅरोथर्सच्या लक्षात आले की या संघनन अभिक्रियेत निर्माण होणारे पाणीच या बहुवारिकांच्या निर्मितीत ढवळाढवळ करत आहे. अभिक्रियेत तयार होणारे पाणी काढून टाकण्यासाठी त्याने विशेष व्यवस्था केल्यावर पहिला संपूर्ण कृत्रिम असा मजबूत धागा निर्माण झाला. या धाग्याला नाव दिले गेले- नायलॉन!

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first successful attempt of a synthetic thread was by joseph swarne of england akp
First published on: 27-11-2019 at 02:21 IST