मातीच्या थरांत सापडणाऱ्या जीवाश्मांकडून पृथ्वीच्या इतिहासाबद्दल तसेच जैविक उत्क्रांतीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. इ.स.पूर्व चवथ्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटल याने सागरतीरी जीवाश्म पाहिले होते; परंतु त्याला या जीवाश्मांचे नेमके महत्त्व सांगता आले नाही. इटलीच्या लिओनार्दो दा विन्चीने मात्र पंधराव्या शतकात, जीवाश्म हे प्राचीन सजीवांचे अवशेष असल्याचे ओळखले. त्यानंतर सतराव्या शतकात डेन्मार्कचा संशोधक निकोलस स्टेनो याने ‘वालुकाश्म (सेडिमेंटरी रॉक) हे काळानुसार आडव्या थरांच्या स्वरूपात पसरले असून, जुने खडक खाली तर नवे वर, अशा रीतीने ते रचले गेले आहेत’, हा निष्कर्ष मांडला. अठराव्या शतकाच्या अखेरीस या खडकांच्या रचनांचा रीतसर अभ्यास सुरू झाला, तसेच या खडकांतील जीवाश्मांचाही सुगावा लागला. त्यानंतर इंग्लंडच्या विल्यम स्मिथ याने खडकाचा थर आणि जीवाश्म यांचा संबंध लक्षात घेऊन, संपूर्ण उत्क्रांतीला आधारभूत ठरणारी भूगर्भीय कालमापनाची पद्धत सुचवली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खडकाची वये समजणे शक्य झाल्यामुळे, त्यात सापडणाऱ्या जीवाश्मांवरून त्या प्रजातीचा सजीव केव्हा निर्माण झाला हे कळू लागले. अखेर इंग्लंडच्याच आर्थर होल्म्स याने १९१३ मध्ये भूगर्भीय कालगणनेचा संपूर्ण आराखडा तयार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कालगणनेनुसार साडेचार अब्ज वर्षांच्या पृथ्वीचा संपूर्ण इतिहास, पृथ्वीवर घडलेल्या घडामोडींनुसार चार युगांत (इऑन) विभागला आहे. प्रत्येक युग हे त्यानंतर क्रमाक्रमाने महाकल्प (इरा), कल्प (पीरियड), उपकल्प (इपॉक) अशा तीन प्रकारच्या कालखंडांत विभागले आहे. आतापर्यंत तीन युगे होऊन गेली असून फॅनेरिझॉइक हे चौथे युग गेली ५४ कोटी वर्षे चालू आहे. प्राणी आणि वनस्पतींनी व्यापलेल्या या युगाची पुराजीव (पॅलिओझॉइक), मध्यजीव (मेसोझॉइक) आणि नवजीवन (सेनोझॉइक) या तीन महाकल्पांत विभागणी केली आहे. यापैकी पुराजीव महाकल्पात जलचर वनस्पती आणि पाण्यातल्याच अपृष्ठवंशीय प्राण्यांचा विकास होत गेला. या महाकल्पाच्या अंती जीवन जमिनीवर आले. मध्यजीव महाकल्पात सरीसृप प्राणी तसेच नेच्यांसमान वनस्पतींची रेलचेल होती. गेली सुमारे साडेसहा कोटी वर्षे चालू असलेल्या, नवजीवन या आजच्या कालखंडात सस्तन प्राणी निर्माण झाले. संपूर्ण भूगर्भीय कालमापनाची जर चोवीस तासांच्या घडय़ाळाशी तुलना केली तर मानव केवळ एका सेकंदापूर्वी निर्माण झाला असे उत्क्रांतीशास्त्र सांगते.

– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The geologic time scale
First published on: 04-03-2019 at 00:03 IST