scorecardresearch

भाषासूत्र : वाक्प्रचारांतील रंगतरंग

अनुभवांमुळे परिपक्वता येणे. उदा. आजोबा म्हणतात, ‘माझं ऐका जरा पोरांनो! उगाच काळय़ाचे पांढरे झालेले नाहीत.’

भाषासूत्र : वाक्प्रचारांतील रंगतरंग
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

डॉ. नीलिमा गुंडी

रंग हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. वाक्प्रचारांमध्ये त्यांचे ठसे कसे उमटले आहेत, ते पाहू. वेगवेगळय़ा क्रियापदांबरोबर वावरताना रंग शब्दच कसा रंग बदलतो, तेही पाहण्याजोगे आहे! रंग भरणे म्हणजे विशेष मजा येणे. आपण रांगोळीत रंग भरतो, तेव्हा रांगोळी उठून दिसते! तसेच येथे अभिप्रेत आहे. उदा. वादकांची उत्तम साथ मिळाल्यावर मैफिलीत रंग भरतो. रंग चढणे म्हणजे धुंदी येणे. रंग उडवणे म्हणजे चैन करणे आणि रंगात येणे म्हणजे तल्लीन होणे.

रंगरूपास येणे म्हणजे फलद्रूप होणे, सुरू झालेले काम पूर्णत्वास जाणे. उदा. माझ्या घराचा नकाशा तयार असला, तरी घर रंगरूपास यायला सहज एखादे वर्ष लागेल!

विविध रंगांच्या छटाही वाक्प्रचारांमध्ये आढळतात. उदा. काळय़ा दगडावरची रेघ म्हणजे कधीही पुसले जाणार नाही असे लिखाण. याचा सूचितार्थ आहे दृढनिश्चय किंवा अक्षय गोष्ट. असाच आणखी एक वाक्प्रचार आहे- पांढऱ्यावर काळेकरणे. कागद पांढरा असतो, त्यावर पेन्सिलीने/ काळय़ा शाईने खरडणे, हा त्याचा वाच्यार्थ आणि साक्षर होणे, हा त्याचा लक्ष्यार्थ. नवकवी बा. सी. मर्ढेकर लिहितात : ‘काळय़ावरती जरा पांढरे/ ह्या पाप्याच्या हातुन व्हावे/ फक्त तेधवा : आणि एरव्ही/ हेच पांढऱ्यावरती काळे’

काळय़ाचे पांढरे होणे म्हणजे केस पांढरे होणे, वृद्धावस्था येणे. यातील सूचितार्थ आहे- अनुभवांमुळे परिपक्वता येणे. उदा. आजोबा म्हणतात, ‘माझं ऐका जरा पोरांनो! उगाच काळय़ाचे पांढरे झालेले नाहीत.’

काही रंग आपल्या स्वभावामुळे कसे अर्थपूर्ण ठरतात, ते पाहण्याजोगे आहे. उदा. तांबडा रंग हा दुरून लक्ष वेधून घेणारा असतो. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करताना लाल बावटा/ लाल दिवा धोक्याची सूचना देतो, वाहतूक थांबवतो. म्हणून ‘कामात अडथळा आणणे’ असा अर्थ त्याला प्राप्त झाला आहे. उलट ‘हिरवा बावटा मिळणे ’ या वाक्प्रचाराला ‘कामाला अनुमती मिळणे’ असा अर्थ प्राप्त झाला आहे. एकंदरीत या वाक्प्रचारांनी आपल्या भाषेत नक्कीच रंग भरले आहेत!

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 02:14 IST

संबंधित बातम्या