एक ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणून भारतात आलेले वेरियर एल्विन हे ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ पुढे धर्मप्रचाराचे काम सोडून वन्य जमाती, आदिवासी यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करीत राहिले, त्यांच्यातच राहू लागले. त्यांचा हा जीवनप्रवास चकित करणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांचे पूर्ण नाव हॅरी वेरियर होलमन एल्विन. जन्म इंग्लंडमधील डोव्हरस येथे १९०२ साली झाला. सिओरा लिआनचे बिशप एडमंड हेन्री एल्विन यांचा हा मुलगा. डीन क्लोज स्कूल आणि ऑक्स्फर्डचे मेर्टिन कॉलेज येथून त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले. १९२५ ते १९३६ या काळात ते ऑक्स्फर्डमध्ये प्रोफेसर होते आणि ऑक्स्फर्ड इंटर कॉलेजेट ख्रिश्चन युनियनचे अध्यक्षही होते. मात्र १९२७ मध्ये ऑक्स्फर्डची नोकरी सोडून ते भारतात ख्रिश्चन मिशनरी म्हणून आले. त्यांनी प्रथम पुण्यात येऊन तिथल्या ख्रिश्चन सíव्हस सोसायटीत आपल्या कार्याला सुरुवात केली. वेरियर एकदा मध्य प्रदेशातील (सध्या छत्तीसगढ) बस्तरजवळच्या आदिवासी वस्तीत गेले असता त्यांच्या रूढी, जीवनशैली पाहून त्यांचे कुतूहल चाळवले आणि त्यांनी या लोकांचा मानववंशशास्त्रीय अभ्यास करायचे ठरवले.

पुण्याच्या शामराव हिवाळे या माणसाला बरोबर घेऊन पूर्व महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसाच्या वन्य जमाती आणि आदिवासी पाडय़ांमध्ये एल्विन यांनी आपले कार्यक्षेत्र निवडले. पूर्व मध्य प्रदेशातील वन्यजमातींपकी गौड आणि बगा या अतिमागासलेल्या जमातींच्या रूढी, परंपरा आणि समस्या माहीत झाल्यावर वेरियार त्यांच्यातच राहून कार्य करू लागले आणि त्यांचे ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य बंद पडले. यामुळे चर्चच्या संतप्त झालेल्या ज्येष्ठ धर्मगुरूंना ते टाळू लागले आणि पुढे तर त्यांनी हे धर्मप्रसाराचे काम सोडले! मध्यंतरी वेरियर हे महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारप्रणालीने, तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन जमेल तेव्हा त्यांच्याबरोबर साबरमतीच्या आश्रमात जाऊन राहू लागले. महात्मा गांधींच्या सहवासामुळे त्यांचे निकटवर्तीय असलेले जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी वगरेंशीही वेरियर एल्विन यांचा दृढ परिचय झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Verrier elwin
First published on: 17-09-2018 at 01:43 IST