दृष्टिदोष सुधारण्याकरिता प्राचीन काळापासून वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. काचेच्या गोळ्यातून अक्षरांकडे पाहिले असता, अक्षरे मोठी झालेली दिसतात हे इ.स.पूर्व सातव्या शतकात, मध्य-पूर्वेतील सीरिअन लोकांनाही माहीत होते. काचेच्या गोळ्याच्या अशा भिंगांचा वापर इजिप्त आणि बॅबिलोनमध्येही प्रचलित होता. याच काळात रोमन आणि ग्रीक लोक पाणी भरलेल्या काचेच्या पोकळ गोळ्याचा भिंग म्हणून वापर करीत. इ.स.नंतर अकराव्या-बाराव्या शतकात इटलीतील धर्मगुरू काचेचा अर्धगोल पुस्तकावर ठेवून, त्यातून वाचन करीत असत. त्यानंतर ज्याला ‘चष्मा’ म्हणता येईल, असा भिंगांच्या चष्म्यांचा वापर, मुख्यत: इटलीतील धर्मगुरूंनीच तेराव्या शतकाच्या अखेरीस सुरू केला. या चष्म्यांसाठी लागणारी भिंगे, काच घासून तयार करण्याची सुरुवात इटलीतील व्हेनिसजवळच्या मुरानो या बेटावर झाली.
सुरुवातीचे चष्मे हे फक्त बहिर्गोल भिंगाचेच असायचे. त्यामुळे ते फक्त वाचण्यासाठीच उपयुक्त होते. पंधराव्या शतकाच्या मध्यावर निकोलास कुसा या जर्मन धर्मगुरूने अंतर्गोल भिंगांचा वापर करून दूरचे दिसण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा चष्म्याची निर्मिती केली. इ.स. १७८४ मध्ये बेन्जामिन फ्रँकलिन याने एकाच चष्म्यात बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग बसवलेल्या ‘बायफोकल’ चष्म्याची निर्मिती केली आणि एकाच चष्म्यातून जवळचे तसेच दूरचे पाहण्याची सोय झाली. त्याचा पहिला लाभार्थी फ्रँकलिन स्वत:च होता.
चष्म्याचा जन्म झाल्यानंतरही चष्म्याचा वापर करणे मात्र फारसे सोयीचे नव्हते. चष्म्याची भिंगे ही एका दांडय़ाने जोडलेल्या लाकडाच्या दोन चौकटींत बसवली जायची. या चष्म्याच्या बाजूला जोडलेली उभी दांडी हातात धरून वाचन करावे लागे. त्यानंतर या चष्म्याच्या मध्यभागी चिमटा बसवण्यात येऊ लागला. हा चिमटा नाकाच्या फुगीर भागाला चिमटीत पकडून ठेवत असे व चष्मा नाकावर स्थिर राही. असा चष्मा हातात पकडावा लागत नसला तरी, त्या व्यक्तीला श्वास घेताना त्रास जाणवत असे. अठराव्या शतकात या चष्म्याच्या दोन बाजूंना, कानावर अडकवता येतील अशा काडय़ा लावल्या गेल्या. परंतु असा चष्मा वापरताना तो नाकावरून घसरू न देण्यासाठी कसरत करावी लागे. अखेर, काडय़ा जिथे भिंगांना जोडलेल्या असतात, तिथे स्प्रिंगचा वापर करण्यास सुरुवात झाली आणि चष्मा डोक्याला चिकटून राहून न घसरता डोळ्यांसमोर विराजमान झाला.
शशिकांत धारणे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org