आतापर्यंत मूलद्रव्यांपकी काही सुरुवातीची मूलद्रव्ये आपण पाहिली; सोबतच्या चित्रांत काही अंकांचा उल्लेख, काही इंग्रजी अक्षरे, विशिष्ट पद्धतीची मांडणी आदि गोष्टी होत्या. त्याचप्रमाणे काही शास्त्रीय संज्ञांचा वापरही लेखांमध्ये होता – अणुक्रमांक, अणुभार, प्रोटॉन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन, संयुजा, समस्थनिके इत्यादी. मूलद्रव्यांच्या पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी या सर्वाची थोडक्यात माहिती करून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूलद्रव्य नेमके कशाला म्हणावे? एखाद्या वस्तूचे इतके साधे-सोपे रूप, ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येणार नाही आणि त्याचबरोबर त्याचे सर्व अणु हे एकसारखे आहेत, त्यास मूलद्रव्य म्हणता येईल. उदाहरण द्यायचे झाले तर पाणी हे मूलद्रव्य नाही. कारण त्याचे रासायनिक प्रक्रियेने विघटन केले असता हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो. परंतु हायड्रोजन अथवा ऑक्सिजनचे अशा प्रकारे रासायनिक विघटन करता येत नाही. म्हणून पाणी हे मूलद्रव्य नाही आणि हायड्रोजन तसेच ऑक्सिजन ही मूलद्रव्ये आहेत. मिठाचे रासायनिक प्रक्रियेने सोडियम, क्लोरीन आदींमध्ये विघटन करता येते, त्यामुळे मीठ मूलद्रव्य नाही. परंतु, सोडियम तसेच क्लोरीन ही अविघटनशील असल्याने मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्य हे रोमन लिपीतील अक्षरांनी दर्शविले जाते, उदा. हायड्रोजन (H), कार्बन (C), नायट्रोजन (N), ऑक्सिजन (O). जिथे दोन अक्षरांचा वापर होतो अशा ठिकाणी हेलिअम (He), मॅग्नेशिअम (Mg), निकेल (Ni).

अणु कशाला म्हणावे, तर अशा मूलद्रव्याचा छोटय़ात छोटा, अविभाज्य अर्थात ज्याचे विभाजन करता येत नाही असा कण, की जो त्या मूलद्रव्याचे सर्व भौतिक-रासायनिक गुणधर्म स्वत:मध्ये टिकवून ठेवतो. याचा अर्थ अणूचे विभाजन होत नाही असे नाही, अणूचेही विभाजन होते. इलेक्ट्रॉन (ऋण-विद्युतभार असलेले कण, e-), प्रोटॉन (धन-विद्युतभार असलेले कण, p+) आणि न्युट्रॉन (उदासीन अर्थात कोणताही विद्युतभार नसलेले कण, n0); ही नावे आपण ऐकली असतील. प्रत्येक मूलद्रव्याचा अणु वेगळा! या भिन्न मूलद्रव्यांच्या अणूचा आकार शास्त्रीय परिभाषेत सुमारे ६० ते ६०० पिकोमीटर (१पिकोमीटर = १x १० – १२ मीटर). हे सोपे करायचे झाले तर असे म्हणता येईल -सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावरील केसाच्या सरासरी जाडीमध्ये सरासरी आकाराचे सुमारे पाच लक्ष अणु बसतील.

– विनायक कर्णिक , मुंबई</strong>

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is a chemical element
First published on: 25-01-2018 at 02:50 IST