डॉ. मोनाली साळुंखे
मानव आणि निसर्ग यांचे नाते हे प्राचीन काळापासून वेगळ्या स्तरावर उलगडत गेले आहे. मानव नेहमीच आपल्या सभोवती असणारी झाडे, वनस्पती, प्राणी यांचा आपल्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी असलेल्या या नात्याच्या संबंधांचा अभ्यास करत आलेला आहे. मात्र सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रगत अभ्यासामुळे गेल्या काही दशकांत मानवाचे लक्ष आंतरनिवासी कवके (एन्डोफायटिक फंजाय) या विशेष घटकाकडे वेधले गेले.
आंतरनिवासी कवके ही अतिशय सूक्ष्म असून ती वनस्पतीच्या पेशींमध्ये, मुळांमध्ये, खोडांमध्ये व पानांमध्ये वास्तव्य करतात; मात्र ती वनस्पतींमध्ये कुठलाही रोग उत्पन्न करत नाहीत. ती वनस्पतींच्या अंतर्गत ऊतींमध्ये जणू अदृश्य पाहुण्यांप्रमाणे राहतात. त्यांना या बुरशीचा फायदाच होतो. त्यामुळे त्यांचे नाते हे सहजीवी स्वरूपाचे मानले जाते.
जगभर हवामानातील बदलामुळे शेतीसमोर दुष्काळ, उष्णतेची लाट, खारट माती यांसारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. अशा वेळी आंतरनिवासी कवके वनस्पतींसाठी आधार ठरतात. या बुरशींच्या उपस्थितीमुळे वनस्पतींच्या पेशींमध्ये अनेक बदल घडून येतात, त्यामुळे वनस्पती प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतात. काही कवके वनस्पतींमध्ये दुय्यम रसायने निर्माण करतात ज्यामुळे वनस्पतींना तणाव सहन करण्याची ताकद मिळते. परिणामी पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होते.
वनस्पतींचे सर्वांत मोठे शत्रू म्हणजे रोगकारक जीवाणू, कवके आणि कीटक. आंतरनिवासी कवके मात्र अशा रोगकारक सूक्ष्मजीवांच्या विरोधात सक्रिय जैवरसायनांचे उत्पादन करतात. त्यामुळे वनस्पतींना रोगांचा सामना करता येतो. आंतरनिवासी बुरशींमुळे वनस्पतींची रोगप्रतिकारक्षमता वाढते. अलीकडे जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अशा बुरशींवर आधारित अनेक नवीन प्रयोग सुरू असून त्यातून शाश्वत शेतीला नवे मार्ग सापडत आहेत.
आंतरनिवासी कवके केवळ शेतीतच नव्हे तर वैद्याकीय क्षेत्रातही फार उपयुक्त आहेत. याचे उत्तम व सर्वांत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे टॅक्सॉल औषध. हे कर्करोगावरील औषध, अत्यंत प्रभावी आंतरनिवासी बुरशींपासून मिळते. याशिवाय प्रतिजैविके, अँटीव्हायरल, अँटीफंगल औषधेही या बुरशींपासून तयार करता येतात. जगभरात या बुरशींवर आधारित औषधनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. थोडक्यात, आंतरनिवासी कवके या वनस्पतींच्या अदृश्य पण अतिशय उपयुक्त साथीदार आहेत. मानवी आरोग्य, औषध निर्मिती, शाश्वत शेती आणि पर्यावरण रक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. भविष्यात त्यांच्या सखोल अभ्यासामुळे त्यांचे नवनवीन उपयोग समोर येतील आणि मानव-निसर्ग नात्याची अजून एक नवी कडी जोडली जाईल.
डॉ. मोनाली साळुंखे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org