दु:ख कसे हलके होणार?

‘लोकरंग’मधील (७ ऑक्टोबर) गिरीश कुबेर यांचा ‘या आनंदाचा त्रास होतो!’ हा लेख सामान्यजनांची देशातील वर्तमान ‘महान’ लोकशाही व्यवस्थेविषयीची खदखद व्यक्त करणारा आहे. मतदानाव्यतिरिक्त नागरिकांना भारतातील लोकशाही व्यवस्थेत प्रत्यक्ष सहभागाची संधी, व्यवस्थेविषयी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, सामान्यजनांच्या मताला दिला जाणारा प्रतिसाद लक्षात घेता प्रश्न पडतो, की भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बीजारोपण झाले आहे का?

लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असे म्हटले जाते. मात्र, प्रत्यक्षात लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग अभावानेच दिसतो. पारदर्शकता हा लोकशाहीचा पाया समजला जात असला तरी सर्वपक्षीय नेत्यांचा कल हा गुप्ततेकडेच दिसतो. त्यामुळे लेखाच्या शेवटी ‘महान लोकशाही आणि सर्वात मोठी लोकशाही यातला फरक लक्षात घेतला, की हा त्रास कमी होईल बहुधा’ असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात संवेदनशील नागरिकांच्या दु:खात वाढच होते. लाखो रुपये भरूनही मिळणारे दर्जाहीन शिक्षण असो वा आरोग्य सेवेत सामान्यजनांची होणारी ससेहोलपट असो, त्याबाबत व्यक्त होण्यावर मर्यादाच येतात. आणि व्यक्त झाले तरी त्यास किती प्रतिसाद दिला जातो, हाही प्रश्नच आहे. असे असताना दु:ख कसे हलके होणार?

– सुधीर लक्ष्मीकांत दाणी, नवी मुंबई</p>

काळही सोकावला!

‘या आनंदाचा त्रास होतो!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. हा लेख भारतीय सत्ताधारी, पत्रकार आणि सर्व बुद्धिवाद्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा वाटला.

जगातील महासत्ता आणि लोकशाही देश असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतरानंतर तेथील बुजुर्ग पत्रकार बॉब वुडवर्ड लिखित ‘फिअर : ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ आणि फ्रेडरिक फोर्सिथची कादंबरी ‘द फॉक्स’ या पुस्तकांतील आशयाचे भारतीय राजकीय परिस्थितीशी तुलनात्मक, पण अतिशय मार्मिकपणे विश्लेषण लेखात केले आहे. भारतात पत्रकार आणि बुद्धिवाद्यांच्या होणाऱ्या हत्या, साहित्यिकांच्या लिखाणावर होणाऱ्या टीका, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आणि जनसामान्यांच्या टोकदार होणाऱ्या अस्मिता या बाबी प्रकर्षांने जाणवत आहेत.

मुद्दा असा आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘भीती निर्माण करण्यात खरी सत्ता असते’ हे वाक्य भारतीय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीलाही लागू पडते आहे! लेखात या सर्व परिस्थितीचा लेखाजोखा परखडपणे मांडला आहे. मात्र, लोकशाहीचा चौथा खांब असणारी प्रसारमाध्यमे जोपर्यंत निर्भीड होत नाहीत आणि सत्ताधारी वर्गाचा त्यांच्यावरील अंकुश कमी होत नाही तोपर्यंत लेखाच्या शीर्षकाप्रमाणे या आनंदाचा त्रास होतच राहील, हेही खरे. शेवटी असेच म्हणावे लागेल की, ‘म्हातारीही मेली आणि काळसुद्धा सोकावला आहे’!

– प्रवीण रामकृष्ण मोरे, नाशिक

सुभाषशेठ आणि ‘तिळा उघड’

‘लोकरंग’मधील संजय मोने यांच्या ‘मी जिप्सी..’ या सदरातील ‘सुभाषशेठ’ हा लेख (७ ऑक्टोबर) वाचला आणि आश्चर्यचकित झालो. ‘मी ही गोष्ट खूप वर्षांपूर्वी वाचली होती’ असे लेखातील पहिले वाक्य आहे आणि खाली ‘मूळ नाव आणि ठिकाण बदललं आहे’ असेही म्हटले आहे. त्यावरून मला माझ्या ‘तिळा उघड’ या १३४ पानी दीर्घ कथेची आठवण झाली. १९९१ च्या सप्टेंबरमध्ये ते पुस्तक ‘ग्रंथाली’तर्फे प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर चार ओळी आहेत, त्या अशा – ‘अशोक व्यास.. एकेकाळचा कुप्रसिद्ध अट्टल गुन्हेगार. पोलिसांच्या प्रयत्नांनी तो सुधारला आणि कलाव्यवसायात रमला. त्याचीच ही वेधक कहाणी.’ ‘खूप वर्षांपूर्वी’ मोने यांनी जी कथा वाचली ती ‘तिळा उघड’ तर नव्हे?

त्या कथेत व मोने यांच्या लेखात बरेसचे साम्य आहे- अशोक व्यासने स्वत:च बनवलेले ‘निमी’ हे अजब हत्यार, शेकडय़ावर केलेल्या ‘यशस्वी’ घरफोडय़ा, कोणतेही अवघड कुलुप आणि लॅच उघडण्याचे विलक्षण कसब, घरांतला ऐवज नेमका कोठे गवसेल याची अभ्यासू जाण, अफाट पैसा आणि दागदागिने ‘हस्तगत’, पुढे सुरेश पेंडसे, अरविंद पटवर्धन या नि:स्पृह पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या समजावणीमुळे पोलिसांना स्वत:हून शरण जाणे व तुरुंगवास भोगणे आणि नंतर प्रामाणिकपणे कलाव्यवसाय करून कायमचे सरळमार्गी संसारी जीवन स्वीकारणे! हे सर्व मोने यांच्या लेखाशी पूर्णपणे मिळतेजुळते आहे. ‘ग्रंथाली’च्या वार्षिकोत्सवात पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते ‘तिळा उघड’चे प्रकाशन झाले, त्यावेळी मुद्दाम उपस्थित राहिलेल्या अशोकचे पुलंनी भरभरून कौतुक केले होते. असो.

– कृ. ज. दिवेकर, ठाणे</p>