‘सुरेश भट आणि..’ या प्रदीप निफाडकर संपादित पुस्तकाचे मी केलेले परीक्षण २४ डिसेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यावर ३१ डिसेंबरच्या अंकात ‘परीक्षण? की टीकालेख?’ या पत्रात निफाडकरांनी काही अनुचित आक्षेप नोंदविले आहेत. त्यांच्या पत्राच्या संदर्भात माझे स्पष्टीकरण असे-

(१) निफाडकर म्हणतात, ‘‘फसलेले संकलन आहे, मग त्यावर लिहिले कशाला?’’ – कारण ग्रंथप्रेमी वाचकांची परीक्षणाद्वारे दिशाभूल न करणे हे परीक्षकाचे नैतिक कर्तव्य आहे. पुस्तकाची तारीफ करणे म्हणजे परीक्षण नव्हे. (२) निफाडकर म्हणतात त्याप्रमाणे मी या संकलनाची चांगली बाजू शेवटी नमूद केली आहेच, दुसऱ्या बाजूचं पारडं जड होतं, एवढंच. ऐकीव माहितीवरूनही नव्हे, स्वनिर्मित गोष्टींचाच अंतर्भाव त्यांनी अधिक केलेला आहे. (३) निफाडकरांना वाटतं, पण मी त्यांच्यावर अथवा भटांवर व्यक्तिगत टीका केली नसून, संकलनात हेतुपुरस्सर तारतम्यहीन असत्यकथन झालंय ते लक्षात आणून दिलंय. माझी भाषा सुसंस्कृत आहे. (४) साहित्यिकाच्या साऱ्याच रचना काही मास्टरपीस नसतात. भट हे मराठीतील गजल-गीताचे प्रतिभावंत कवी होते, म्हणून मुक्तछंदातील त्यांच्या रचना समकालीन पाडगांवकर, सुर्वे, करंदीकरांच्या कवितेच्या समकक्ष आहेत, असे मराठीतील मान्यवर समीक्षकांनीही मान्य केल्यास मी माझे वक्तव्य मागे घेईन. (५) निफाडकरांनी पुस्तकात जी  मते नोंदविली आहेत त्याचा दुष्परिणाम म्हणून भटांबद्दल वाईट ग्रह होण्याची शक्यता मी सांगितली आहे. (६) नीता भिसे, मोहन गोखले, माधवी वैद्य आदींची नावे नसली तरी त्यांची वाक्ये मी निफाडकरांची म्हणून मुळीच नमूद केलेली नाहीत. ती पृष्ठ क्रमांकासह दिली आहेत. निफाडकरांचे वाक्य- ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ हे त्यांच्याच या संकलनाला यथार्थपणे लागू पडते. (७) फैज, हबीब जालिब यांची उदाहरणं तर माझ्याच म्हणण्याची पुष्टी करतात. दोघांच्या शायरीत राजकीय व सामाजिक विचारांचा अंतर्भाव अवश्य आहे, पण लालित्यपूर्ण शैलीत तो साकारतो. कुसुमाग्रजांच्याही बाबतीत हेच तत्त्व लागू होतं. मग ते आवडते कवी असताना याबाबत भट अनभिज्ञ होते काय? (८) माझी पीएच.डी. गजलवर नाही, तर उर्दू लघुकथेवर आहे- या निफाडकरांच्या म्हणण्याचा सदर परीक्षणाशी काहीही संबंध नाही. मी आजही स्वत:ला गजलविधेचा तज्ज्ञ नव्हे, तर ‘गजल अभ्यासक’च समजतो. (९) ‘भट हे गालिब किंवा जी. ए. होते, असे निफाडकरांनी म्हटले’- असे परीक्षणात मी कुठेच लिहिलेले नाही. भटांची ती पत्रे अत्यंत वैयक्तिक व सामान्य आहेत, या मतावर मी आजही ठाम आहे. शिष्य ही संकल्पना तर भटांनी एका शेरातच नाकारली आहे. जे म्हणवतात ते ‘स्वयंघोषित’ आहेत. (१०) ज्येष्ठ गजलकार रमण रणदिवेंनी स्वत: मला- ‘माझ्या संदर्भातील निफाडकरांनी लिहिलेली घटना व विधान धादांत खोटे व बदनामीकारक आहे’ असे फोन करून सांगितले होते. (११) धर्मवीर भारतींना मी ओळखत होतो. अनेक दिग्गजांच्या सामान्य रचना ते परत करीत असत. अन् मराठीबद्दल असं वाक्य त्यांनी उच्चारले असेल यावर कोणीही हिंदी लेखक सहमत होणार नाही. (१२) निफाडकर यांची मुलाखत व एक जुजबी परिचयात्मक टिपण म्हणजे पुस्तक नव्हे. मी निफाडकरांवर पुस्तक लिहिले नसून मिनी पॉकेट बुक संपादित केले हेच सत्य आहे.

भटांसवे स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा हा हास्यास्पद अट्टहास कशाला? व त्यासाठी निफाडकरांनी उदारहस्ते असत्याचा अंगीकार का करावा? मी निफाडकरांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे यथोचित तर्कनिष्ठ निराकरण केले असल्याने माझ्या बाजूने हा विषय इथे संपवीत आहे.   – डॉ. राम पंडित, नवी मुंबई</strong>