समुद्री जीवांना धोका, मासेमारी संकटात

पालघर : गेल्या काही दिवसांपासून केळवे, दातीवरे, शिरगाव, सातपाटी, समुद्रकिनारे तेलाच्या तवंगामुळे काळवंडले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारे विद्रूप झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना येथे भटकंती करणे त्रासाचे जात आहे. तर  मत्स्यजीव, कांदळवनांना धोका निर्माण झाला आहे. या तवंगामुळे पारंपरिक मच्छीमारांवरही संकट कोसळले आहे.

समुद्राला मिळणाऱ्या अनेक लहान-मोठ्या खाड्या जिल्ह्यात आहेत. हा तवंग समुद्राच्या पाण्याने थेट खाडी परिसरात जात असल्याने खाडीतील माशांना याचा धोका आहे.   पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचा व्यवसायही  धोक्यात आला आहे. किनाऱ्यालगतच्या खडकाळ भागात असलेल्या तिवरांच्या भागातील कालवे, चिंबोरी, कोळंबी, उपळ्या, शिंपल्या तर खाडीच्या मुखपात्रात समुद्रकिनाऱ्यावर खरबे, मोडी, निवटी अशा लहान पण खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले मासे मिळतात, तर बोय, तामसुट, शिंगटी आदी मासे पाण्याच्या पृष्ठभागावर असतात.   तेलाचा तवंग त्या ठिकाणी साचून व तरंगत असल्यामुळे माशांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने हजारो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर अथवा पाण्यावर तरंगतानाच्या घटना अधूनमधून घडत आहेत.

समुद्रातील मोठी जहाजे, रासायनिक प्रदूषण  यामुळे तेलसदृश रसायनाचे घनकचऱ्यात रूपांतर होते. हे तेलतवंग भरतीच्या पाण्यामुळे किनाऱ्यावर आणून सोडले जातात. वाळूच्या संपर्कात आल्याने वाळू ते तेल शोषून घेते. त्यामुळे तेलतवंग निर्माण होतात. या तवंगना टार बॉल्स असेही नाव आहे. हा तवंग समुद्रकिनारा विद्रूप करतोच, पण याचे मोठे दुष्परिणाम आहेत असे समुद्री व पर्यावरणतज्ज्ञ सांगत आहेत.

पावसाळी मासे उत्पत्तीच्या काळातच तेलतवंगाच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात. या वेळी सुरुवातीला अंडी घालण्यासाठी मासे किनारी भागात येतात. अशा वेळी या तवंगामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावर होतो. हे मासे त्या तेलतवंगच्या थरात सापडून त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे मासे उत्पत्तीवरही त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे.

दुष्परिणाम

या तेलतवंगामुळे त्वचेचे आजार होतात. समुद्राच्या खडकाळ भागातील तिवरांच्या झाडांमध्ये तवंग अडकून राहत असल्याने त्या भागातील मिळणारे समुद्री मासे नामशेष होत चालले आहेत, तर येथील परिसरात आता मिळणाऱ्या माशांना रसायनसदृश वास येत आहे. त्यामुळे ग्राहक अशा खाडीतील मासे विकत घेत नाहीत.  लहान प्रमाणात व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कुटुंबावर त्याचा परिणाम जाणवत आहे.समुद्री कासवावरही या तेलतवंगाचा मोठा परिणाम होत आहे.