पालघर: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीईअंतर्गत २५ टक्के जागांवर होणारी प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील २५४८ प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून 35 विद्यार्थ्यांचे कागदपत्रांअभावी अर्ज बाद झाले आहेत. तर १२३४ विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यामुळे आरटीइ प्रवेशापासून हे विद्यार्थी वंचित राहिले आहेत.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशकरिता जिल्ह्यातील 272 शाळांच्या 5142 जागेकरिता 5132 अर्ज भरण्यात आले होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पडताळणी करून यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील ३८१७ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निश्चिती देण्यात आली होती.
आरटीई अंतर्गत प्रवेशाची यादी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत २५४८ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे तर अर्जांच्या पडताळणी दरम्यान 35 विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे अर्ज परस्पर बाद करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक २९ अर्ज वसई तालुक्याचा समावेश होता. मात्र यादीत नाव येऊन देखील प्रवेश प्रक्रिया न घेतल्यामुळे जिल्ह्यातील १२३४ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेतून कायमचे बाद झाले आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी १४ मे ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. आरटीई अंतर्गत प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही एक ते दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली, परंतु या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील प्रवेशासाठी तितकासा उत्साह दिसून आला नाही.
प्रवेश न घेतल्याची कारणे…
या वर्षाची आरटीई प्रवेश प्रकिया ही वेळेत पूर्ण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पालक प्रवेश घेण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. यामागे अर्ज भरण्याकरिता पालकांना योग्य मार्गदर्शन न मिळणे, कागदपत्रांची पूर्तता न करता अर्ज भरणे, घरापासून लांब अंतरावरील शाळा निवडणे, अर्ज भरताना पालक सीबीएससी व डेट बोर्ड इंटरनॅशनल बोर्ड असे सर्व प्रकारच्या शाळा सिलेक्ट करतात मात्र अर्जामध्ये स्टेट बोर्डला नंबर लागला तर, पालक प्रवेश घेण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. अशी अनेक कारणे विद्यार्थी बाद होण्यासाठी कारणीभूत आहेत.
अधिकतर जागा रिक्त
पालकांमध्ये जनजागृती व अर्ज करण्याची व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्याने या प्रवेशप्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात होते. मात्र निवड यादीत आल्यानंतर देखील एकाच शाळेचा आग्रह, जात व उत्पन्नाचा दाखला, ग्रामीण भागात अंतराची मर्यादा, आरटीई करिता आवडीच्या शाळा न मिळणे, यादीत नाव आल्यानंतर पालकांनी करावयाची धावपळ, यादी जाहीर झाल्यानंतर देखील योग्य वेळी प्रवेश न घेणे, ग्रामीण भागात इच्छेप्रमाणे शाळा न मिळणे तसेच आरटीईची प्रक्रिया ही लांबलचक असल्याने पालकांनी प्रवेश टाळण्याचे कारण पुढे येत आहे. अशा अनेक कारणांमुळे आरटीई च्या अधिकतर जागा रिक्त राहत आहेत.
जिल्ह्यातील अनेक पालकांनी अर्ज भरताना अधिक शाळा निवडल्याने मनासारख्या शाळा मिळत नसल्याने पालकांचा हिरमोड होतो. आता पुन्हा यादी लागण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत अजून शासनाकडून निर्णय आलेला नाही. मात्र पालकांनी शाळा निवडताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. – सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक